मराठी
चला, आपल्या शहराला FLOWER CITY फुलांचे शहर करूयात!
संशोधक आणि लेखक विजय लिमये ह्यांची प्रत्येक शहरातील नागरिकाला अनोखी साद, चला, आपल्या शहराला FLOWER CITY फुलांचे शहर करूयात!
Flower City म्हणजे फुलांचे शहर.. असे शहर जिथे दिसतात आसमंतात आनंदाच्या, प्रफुल्लतेच्या रंगबिरंगी छटा पसरविणारी फुले! तसेच रस्त्यावर नित्यनियमाने वेगवेगळ्या फुलांचे सडे घालून पाहुण्यांचे स्वागत करणारी फुल झाडे. एखादे शहर Flower City म्हणजे फुलांचे शहर करता येईल काय? वेगवेगळ्या रंगांच्या, आकाराच्या, सुगंधाच्या फुलांचे शहर? लेखक विजय लिमये विचारताहेत, नागरिकांनी ठरवले तर कां नाही? प्रत्येक शहर तसे ट्रान्सफॉर्म करता येईल. सध्या त्यांनी त्यांचे शहर नागपूरला फुलांचे शहर म्हणून नावारूपाला आणण्याचा ध्यास घेतलेला दिसतोय.
विजय लिमये
काही वर्षांपूर्वी पर्यावरण पूरक अंत्यसंस्कार या विषयावर मी काम करायला सुरुवात केली आणि त्यातूनच नवीन नवीन विषयांचा जन्म झाला.
असाच एक विषय घेऊन, आता पुन्हा एकदा जोमात काम करायला सुरुवात केली आहे. स्वर्गद्वार ही संकल्पना घेऊन अंबाझरी स्मशान घाट सुशोभीकरणाचे काम सुरू केलेले आहे. विविध सामाजिक संस्था या कामी आपापले योगदान देत आहेत.
सुशोभीकरण करण्याच्या या कामात घाटावर फुलझाडे लावून जिवंत फुलांनी सजवलेला घाट ही संकल्पना राबवायची आहे आणि त्यासाठी आम्हाला मोठ्या प्रमाणात फुलझाडे दान रुपात मिळाली ती झाडे पावसाळ्यात आम्ही दहन घाटावरील विविध ठिकाणी लावून स्वर्गद्वाराची शोभा वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
याच कार्यतील पुढचा भाग असा आहे, ज्यात नागपूर महानगरपालिकेला आम्हाला दाखवून द्यायचे आहे; शहरातील सर्व मोकळ्या, पडीक जमिनीवर आपण अशीच फुलझाडे लावली तर संपूर्ण शहर हे फुलांचे शहर म्हणून ओळखले जाऊ शकते.
त्यासाठी नागपूर महानगरपालिकेने आदेश काढून शहरांमधील जितक्या मोकळ्या जमिनी असतील तिथे स्थानिक नागरिकांचे सहकार्य घेऊन आठ ते दहा फूट उंच वाढणारी विविध प्रकारची फुलझाडे लावावी. त्यात प्रामुख्याने पारिजातक, जास्वंद, दूध मोगरा, जाई, जुई, चमेली, तगर, कन्हेर, आदी अनेक झाडे, वेली ज्यांना रोगराईची फारशी लागण होत नाही, तसेच उन्हाळ्यात पाणी नाही मिळाले तरीही अशी झाडे तग धरून राहतात, लावल्यास तो परिसर जिवंत फुलांनी सजलेला दिसेल.
त्याचबरोबर लोकांना देवपूजेसाठी मोठ्या प्रमाणात या झाडांपासून फुले मिळू शकतील आणि दुसऱ्याच्या खाजगी हद्दीत चोरून तसेच काठीने वाकवून फुले तोडण्याचा मानापमानाचा कार्यक्रम घडणार नाही.
याशिवाय, मोठ्या प्रमाणात फुले असल्याने, शहरात फुलपाखरांची, मधमाश्यांची संख्या वाढेल. हे किटक परागीभवनाचे अमूल्य काम विनामूल्य करून, मानवासहित सर्व जीवसृष्टीचे अन्नदाते बनून जीवन सुकर करतात.
फुलांचे शहर बनविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान द्यावे ही नम्र विनंती.
विजय लिमये
मोबाईल नंबर: 9326048204.