मराठी
एक कर्णबधीर चित्रकार म्हणतोय, मला रंगवू द्या हे आसमंत!
कुंचल्याने ऐकणाऱ्या ह्या कलावंताला आपली साथ हवी आहे!

कर्णबधीर चित्रकार म्हणून त्याची ओळख आहे हे मान्य, पण त्याची खरी ओळख आहे त्याची कला!
सदतीस वर्षाचा स्वप्नील मेहेंदळे, पुण्याचा सिद्धहस्त चित्रकार ! कुंड्या असोत की भिंती, त्याच्या कुंचल्याने अगदी जिवंत होतात. परिस्थितीशी दोन हात करून आता कुठे तो सोशल मीडियाचा विधायक उपयोग करून स्वबळावर उभा होतो आहे ! त्याला आर्थिक स्थैर्य मिळावे, याकरिता आपण साथ देऊ या !
इंडिया इनपुट डेस्क, मुंबई
पुण्याचा कलावंत स्वप्नील. त्याने रंगविलेल्या कुंड्या, भिंती, दारे, वॉल पेंटिंग्ज, किंवा छोटे मोठे साहित्य प्रत्यक्ष पाहिले तर उठावदार, बोलके आणि अगदी जिवंत झाल्यासारखे वाटतात. प्रदीर्घ काळ संघर्ष केल्यानंतर स्वप्नील ने सोशल मीडियाचा कल्पकरित्या उपयोग करून स्वतःच्या कलेची आणि स्वतःची ओळख काही अंशी आता निर्माण केली आहे. आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि सहकार्याची जोड मिळत गेली तर त्याच्या कलेचे, कल्पनाशिलतेचे आणि मेहनतीचे चिज होईल, त्याच्या स्वप्नांना वास्तवाची जोड मिळेल.
त्याच्या कामाची प्रसिध्दी व्हावी, त्याच्यातील कलागुणांना उत्तेजन मिळावे, त्यातून त्याला आर्थिक स्थैर्य मिळावे, याकरिता त्याच्या प्रयत्नांना प्रमोट करण्याचा Indiainput.com चा हा प्रयत्न आहे. वाचकांनी यात सहभागी व्हावे अशी अपेक्षा आहे.
इथे प्रस्तुत आहे, स्वप्नील चे संक्षिप्त मनोगत त्याच्याच शब्दांत :








मी स्वप्नील मेहेंदळे. मी स्वतः कर्णबधिर आहे.. म्हणजे असे, की मला ऐकू आणि बोलायला फार फार कमी येते..
मी कर्वेनगर, पुण्यात राहतो.. बाबा खाजगी नोकरीतून रिटायर्ड झालेत. आई आणि मामा पाणीपुरी भेळ चा व्यवसाय करतात.
मला लहानपणापासून चित्रकलेची फार आवड आहे..
त्यामुळे चित्रकलेत शिकायची फार हौस होती आणि आहे. मी मागे सदाशिव पेठेत निंबाळकर तालीम जवळ आपटे चित्रकला क्लासला शिकत होतो.. तिथे 3 वर्ष पेन्सिल स्केच, कलर पेंट आणि बरीच चित्रं काढायला शिकलो..
त्यानंतर मी सोशल मीडियाचा वापर करु लागलो.. फेसबुकवर BBN, घे भरारी आणि गार्डन ग्रुप इत्यादी ग्रुप्सवर होतो
गार्डन ग्रुप वर माहिती बघता बघता माझ्या डोक्यात एक विचार आला.. कुंड्यांवर चित्रं काढून ती सोशल मीडिया वर टाकून बघूया आणि जमले तर त्यातून विकण्याचा व्यवसाय सुरू करुन पाहू या..
मग मी गार्डन शॉपवरगेलो. तिथे जाऊन 4 – 5 कुंड्या आणल्या आणि त्यावर कलर मारून चित्र काढून ती चित्रं मी फेसबुक वर टाकलीत.. मला आनंद याचा झाला, की लोकांना ती आवडली सुध्दा !
हाच माझ्याकरिता टर्निंग पॉईंट ठरला. कारण, सोशल मिडिया ने मला माझी कला लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी फार मोलाची मदत केली.
त्यातून मला प्रचंड रिस्पॉन्स आणि ऑर्डर मिळाल्या.. तिथून हळू हळू मी दिवाळीत पणत्या रंगवून विकणे, हँडमेड कंदील बनवून विकणे असे छोटेसे व्यवसाय सुध्दा सुरू केले..




त्यानंतर फेसबुक वरील BBN ग्रुप मधल्या एका मॅडमनी भिंतीवर वारली पैंटिंग करायला मला ऑर्डर दिली. मी पण ते आव्हान आनंदाने स्वीकारले. तो तसा माझा पहिला प्रयत्न होता. मी व्यवस्थित आणि सुंदर वारली पेंटिंग केले.. आणि ते पण फेसबुक वर टाकून बघितले ! त्यात सुद्धा मला चांगला रिस्पॉन्स आणि ऑर्डर्स मिळत गेल्या..!!
तिथून मी दिवाळीसाठी पणत्या रंगवणे, कंदील बनवणे, कुंड्या पेंट करणे, वारली पैंटिंग करणे, काचेची बॉटल पैंटिंग करणे, कॅनवस पैंटिंग करणे हा व्यवसाय सुरू केला.. 3 वर्ष झाली, मी माझ्या आवडत्या कले च्या माध्यमाने व्यवसाय सुरू करून.. त्यातून माझी ओळख निर्माण झाली.
माझी पत्नी सुद्धा कर्णबधिर आहे. ती बी कॉम झाली असून स्पर्धा परीक्षे करिता सध्या तयारी करतेय. तरीही मला तिची खूप मोलाची मदत असते. अगदी पेंट किंवा ब्रश सारख्या वस्तू विकत घेण्याचा विषय असेल किंवा क्लायंट ला कसले चित्रं हवे, कुठे काय पेंटिंग करून हवी आहे ते मला समजत नसेल तर किंवा कोण्या क्लायंट कडून इंग्रजीत आलेला एखादा मेसेज मला नीट समजला नसेल तर ती समजून सांगते.
माझा कुंडी रंगविण्याचा दर सामान्यतः
8 इंच 250/- आणि 10 इंच 300/- असा आहे. वॉल पैंटिंग मी
1 sq ft 1,000/- या दराने करतो. आज जसजसे माझ्या कामा बद्दल लोकांना कळते आहे तसतसे माझ्या कामाला रिस्पॉन्स मिळतो आहे. शिवाय त्यातून ऑर्डर्स देखील मिळत आहेत.
पण ही तर सुरुवात आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि समर्थनाने मला अजून खूप पुढे जायचे, नवे नवे करायचे आहे. छान छान कल्पना आहेत. त्यातून ही कला वाढवायची आहे. पण, ते सारे आपल्या सहकार्याशिवाय शक्य नाही.
म्हणून ही विनंती. आपले आशीर्वाद, समर्थन आणि मार्गदर्शन सदैव माझ्या सोबत असू द्या.
नाव :
स्वप्नील मेहेंदळे, चित्रकार, कर्वे नगर, पुणे.
संपर्क
व्हॉटसऐप : +91 83298 84779.