मराठी

जिल्हा परिषद शाळांना उत्तुंग उंचीवर नेणे असे शक्य आहे!

एक सरकारी अधिकारी आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारे शिक्षक, नागरिक मिळून काय करू शकतात त्याचे जबरदस्त उदाहरण!

जिल्हा परिषद शाळांना चांगल्या खाजगी शाळेइतक्या उंचीवर नेणे शक्य आहे! एका अधिकाऱ्याच्या कामाने आलेला हा अनुभव आहे. 

शब्द शोधणारा, ज्ञान वेचणारा उपक्रमशील अधिकारी म्हटला, की डोळ्यांसमोर येतात करमाळ्याचे (सोलापूर जिल्हा) गट विकास अधिकारी मनोज राऊत! त्यांनी उभे केलेले नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे शाळेच्या माध्यमातून सहजगत्या मोठी संस्कारशील आणि उत्साही , कर्तबगार पिढी घडविण्याचा प्रयत्न. जिल्हा परिषद शाळा म्हटली की नावे मुरडणाऱ्याना आताशा कठीण जातं, ते अशाच हरहुन्नरी आणि दूरदर्शी कृतिशीलतेमुळे! स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त त्यांच्या काही निवडक उपक्रमांची माहिती घेऊ या..  

इंडिया इनपुट टीम

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा हे नाव म्हटले की बातम्यांतून वाचलेले तेथील नाविन्यपूर्ण उपक्रम सहज आठवतात आणि त्या विविध उपक्रमांतून एका अधिकाऱ्याचे नाव देखील वाचलेले आठवते. ते नाव : मनोज राऊत. २०१६ च्या प्रादेशिक लोक सेवा आयोग (एम पी एस सी) परीक्षेतून गट विकास अधिकारी – उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती झालेले श्री राऊत यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी, बुलढाणा येथे, मग उस्मानाबाद येथील कळंब आणि लातूर येथील देवणी येथे पदस्थ होते.

जिल्हा परिषद
श्री मनोज राऊत

इथे त्यांच्या काही प्रमुख उपक्रमांची थोडक्यात माहिती घेऊया .

सायन्स वॉल

सायन्स वॉल. किंवा, त्याला विज्ञानाची भिंत म्हणू या हवेतर. प्राथमिक शिक्षणासोबतच वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेला हा सर्वात महत्वाचा प्रयोग.

जिल्हा परिषद
सायन्स वॉल म्हणजे विज्ञानाची भिंत.

ज्याप्रमाणे प्रशासनाकडून महापुरुषांचे दिवस साजरे केले जातात आणि त्यातून आयुष्यात, समाजात सकारात्मक दिशेने पुढे जाण्याची प्रेरणा मिळते त्याप्रमाणे शास्त्रज्ञाचे दिवस साजरे व्हावेत,आणि त्यांच्या जीवन यात्रेतून, प्रयत्नातून मूलभूत संशोधनात प्रगती व्हावी या उद्देशाने, या संकल्पनेला पंचायत समितीच्या मासिक सभेने मान्यता दिली आणि करमाळा तालुक्यातील सर्व २२७ शाळांमध्ये सायन्स वॉल तयार होऊन हा उपक्रम सुरु झाला.

कशी आहे ही  भिंत?

विज्ञानाच्या तासाला ज्यांच्या संशोधन किंवा संकल्पना शिकविल्या जातात अशा २८ शास्त्रज्ञाच्या तसबिरींना भिंतीवर कलात्मक पद्धतीनं लावून मध्यभागी  मिसाईल मॅन    डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचा  फोटो लावण्यात आला  आहे. ज्या शास्त्रज्ञाची जयंती असेल त्या दिवशी  त्यांनी लावलेला शोध कोणता त्याची माहिती देणे, त्या संबंधी प्रयोग करून दाखविणे आणि त्या वैज्ञानिकांचा  जीवन प्रवास उलगडून सांगणे असा कार्यक्रम असतो.

जिल्हा परिषद
जिल्हा परिषद शाळेत विज्ञानाची भिंत.
जिल्हा परिषद
जिल्हा परिषद शाळांमध्ये नवनवीन उपक्रम राबवून गुणवत्ता वाढवता येते.

ह्या उपक्रमाविषयी महत्वाचे असे की  सरकारी निधीचा एक रुपया हि खर्च न करता लोकसहभागातून सतरा लाख रुपये उभारण्यात आले. समाजातील विविध स्तराच्या लोकांनी वाटा उचलला. अगदी मजुरीची कामे करणाऱ्या लोकांनी शास्त्रज्ञांचे फोटो भेट म्हणून शाळांना दिले.  अशाच एका रोज मजुरी  करणाऱ्या महिलेने आपली एक दिवसाची मजुरी करून त्यातून मिळालेल्या पैश्यातून शास्त्रज्ञ आईन्स्टाईन यांचा फोटो भेट म्हणून दिला.

पण, मनोज राऊत यांच्या संकल्पनेतील  विज्ञानाची भिंत इथेच थांबत नाही. ग्रामीण भागातील कोंढार चिंचोली येथील जिल्हा परिषद शाळा प्रांगणात उभारण्यात आलेला वीस फूट उंचीचा पृथ्वी क्षेपणास्त्राचा प्रोटो टाईप पाहणाऱ्याला थक्क करतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याची प्रतिभा उड्डाणास सिद्ध असल्याचा साक्षात्कार इथे होतो.

जिल्हा परिषद
जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी उभारलेली हि प्रतिकृती बघा.

खासदार सुप्रिया सुळे यांनी हा उपक्रम प्रत्यक्ष येऊन पाहिला आणि प्रशंसा केली. लोकसभेत त्याविषयी विषय मांडणार असल्याचे त्या म्हणाल्या.

शब्द संग्रह

काळ जसा जसा पुढे जातो तसा भाषेतील शब्दांवर त्याचा परिणाम होतो. काही शब्द व्यपगत होत जातात. पुढील पिढयांकरिता ते शब्द शिल्लक उरत नाहीत. ग्रामीण भागात असे शब्द असतात जे विस्मृतीच्या आड जातात. यात बरेच शब्द स्थानिक परंपरा, व्यवसाय, चाली रीती यांचेशी संबंधित असतात. संबंधित परंपरा, व्यवसाय, सण इत्यादी मागे पडले, बंद पडले तर त्यासोबत हे शब्द ही  हरवतात.  मात्र आमचा हा शब्द ठेवा कमी होऊ नये ह्या करिता आपण काय करतो आहोत?

जिल्हा परिषद
गावठाणावर जाऊन अनुभवाचे बोल लिहून घेताना जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी

मनोज राऊत यांचे कडे याचे उत्तर आहे. एकवीस फेब्रुवारी या आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाला करमाळा तालुक्यातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना एक उपक्रम देण्यात आला.  एक दिवस आजी आजोबा किंवा अन्य ज्येष्ठ व्यक्तींची भेट घेणे आणि त्यांचे कडून जुने मराठी शब्द, म्हणी, लोकगीते आणि कोडी ज्यांना लोकभाषेत हुमणे म्हणतात ते लिहून घेण्यास सांगण्यात आले होते. आता हे शब्द आणि म्हणीं ह्यांचा संग्रह प्रकाशित होणार आहे.

जिल्हा परिषद
आजोबा मंडळींकडून जुने शब्द लिहून घेताना जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी.

मनोज राऊत सांगतात, -‘ साधे आपल्या चुली सोबत जुळलेले असे कितीतरी जे शब्द आहेत चुलवाण, काठवट, फुकारी, गवारी, पोतारा आदी ते घरोघरी गॅस आल्यानंतर विस्मृतींत जाणार हे ठरलेले  आहे. ग्रामीण म्हणी मोठया  आशयपूर्ण असतात . त्या तर जीवनाचा सार सांगतात. पिढ्या न पिढ्या जे अनुभव आले, दुःख आले, जे जगणे आले त्या अनुभवांतून त्या येतात आणि    कमी शब्दांतून भाषेची श्रीमंती वाढवितात. इंग्रजी भाषेत अडुतीस हजार शब्द आहेत. संस्कृत मध्ये एक लाख शब्द आहेत.’

जिल्हा परिषद
आमची शाळा ज्ञान आणि अनुभवांचे संग्रह करण्याची.

‘आम्हाला एकट्या करमाळा तालुक्यात सत्तावीस हजार शब्द  आणि तीन हजार म्हणी सापडल्या. यावरून आपल्या मायबोली मराठीच्या श्रीमंतीची, ऐश्वर्याची नेमकी जाण येते, प्रचिती येते, अंदाज येतो.   हे महत्वाचे आहे. हि जाणीव असली तर, ग्रामीण भागातून शहरात गेलेल्या विद्यार्थ्यांना मग भाषेचा, बोलीभाषेचा  न्यूनगंड येणार नाही.’

‘थम्ब्स डाऊन’ चळवळ

साक्षर होण्या करीत पहिली पायरी म्हणजे किमान स्वतःची सही करता येणे.  करमाळा तालुक्यातील सही ना करता येणाऱ्या महिलांना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्त सही करणे शिकविण्याचा हा उपक्रम म्हणजे ही चळवळ .

श्री मनोज राऊत यांच्या शब्दांत सांगायचे तर, -‘थम्ब म्हणजे अंगठा हा आपल्या हातातील अत्यंत महत्वाचा अवयव. पण दुर्दैवानं निरक्षरतेचं प्रतीक झालाय. करमाळा तालुक्यातील १९५३ बचत गटांमध्ये २१ हजार ४८३ महिला कार्यरत आहेत. या गटांना उमेद उपक्रमाच्या माध्यमातून सोळा कोटी रुपये छोट्या मोठ्या उद्योग धंद्याकरिता कर्जवाटप करण्यात आले. मात्र त्याचवेळी ४ हजार ५७ महिलांना सही करता येत नाही म्हणजेच त्या निरक्षर आहेत हि माहिती पुढे आली आणि त्यांना ह्या परिस्थिती तून बाहेर यायला हवे  ह्याची जाणीव करून देणे सुद्धा महत्वाचे होते. त्यांना किमान कर्जाच्या फॉर्म वर सही करता यावी या उद्देशाने आताआतापर्यंत सात शे महिलांना सही करता येणे शिकविण्यात आले असून त्या सही करू शकतात. अर्थातच त्यांनी फक्त कर्जाच्या फॉर्म वरच सही करायची आहे, अन्यत्र नको, अशी सूचना करण्यात आली आहे. एकाने एकास शिकवावे ह्या धर्तीवर आम्ही इथवर पोहोचलो आहे. सर्व ४ हजार ५७ महिलांना सही करता यावी हा उद्देश आहे. स्वाक्षरीतून साक्षरतेकडे असा उद्देश आहे. सही करता आल्याने साक्षर होण्याचा विश्वास  आणि इच्छा  बळावेल ही  आशा आहे.’

दारू सोडा, पाल्यास शिष्यवृत्ती मिळवून द्या !

जिल्हा परिषद
दारू सोडण्याची शपथ
जिल्हा परिषद
गावात शपथ सोहळा अनुभवताना लहान मंडळी.

हा आणखी एक अभिनव आणि अनुकरणीय उपक्रम. नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला नशे पासून परावृत्त करण्यासाठी सर्वानी, एकूणच गावाने प्रयत्न करावे, त्यातून होणाऱ्या हानीची, उदभवणाऱ्या कठीण प्रसंगांची, समस्यांची  जाणीव त्याला करून द्यावी तसेच दारू सोडण्याकरिता त्याच्या मुलास, मुलीस शिष्यवृत्ती मिळेल असे  समजावून द्यावे.  त्याने सर्वांसमक्ष दारू पासून दार होण्याचा संकल्प जाहीर करावा. सर्वानी त्यात त्याची मदत करावी. त्याला एक वर्ष निर्णयावर ठाम राहण्यात यश मिळाले की पुढील वर्षांपासून त्याच्या पाल्याला   शिष्यवृत्ती देण्याचा हा उपक्रम आहे.

या शिवाय, अन्य काही अभिनव उपक्रम असे :

– सर्व वर्गांत व्हाइट बोर्ड लावून धूळ विरहित म्हणजे डस्ट फ्री शाळा करणे.

– वर्गात अभ्यासात मागे राहणाऱ्या शेवटच्या वीस टक्के विद्यार्थ्या कडे  विशेष लक्ष देणे.

– तालुक्यात लिहीता वाचता न येणारा, आकडेमोड करता न येणारा विद्यार्थी दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा.

– नॅक च्या धर्तीवर जिल्हा परिषद शाळांचे मूल्यांकन.

– जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरु करणे.

– जिल्हा परिषद शाळांमध्ये विदेशी भाषा जसे की फ्रेंच, जर्मन आणि स्पॅनिश इत्यादी शिकविणे.

– जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्याना न्यायालये, पोलीस स्टेशन, पोस्ट ऑफिस, कुस्ती तालीम, साखर कारखाने इत्यादी ठिकाणी एक्सपोजर व्हिजिट्स
अंतर्गत घेऊन जाणे.

लोकचळवळ उभी राहावी !

ह्या अशा सर्व उपक्रमामांधून एक प्रकर्षाने जाणवते. ते म्हणजे, स्थानिकांचा लोकसहभाग. विद्यार्थ्याचे कुटुंबीय, आजी आजोबा आणि नातेवाईकच नव्हे तर गावाचे ज्येष्ठ नागरिक आणि वरिष्ठ मंडळी -अशा तमाम लोकांचा उस्फुर्त सहभाग.

जिल्हा परिषद
जिल्हा परिषद शाळेत जगाचा नकाशा पाहताना एक आजोबा.

हे उपक्रम राबवितांना कोणता विचार मनात होता ?

यावर उत्तरादाखल, श्री मनोज राऊत सांगतात, – ‘लोकचळवळ !  हो, हे पंचायत राज चे मूळ तत्व असून कोणताही उपक्रम राबविताना आपण त्याची विसर पडू देऊ नये. लोकचळवळ निर्माण  होणे महत्वाचे आणि सोबतीला यंत्रणेतील प्रशासन, पदाधिकारी, नागरी समाजातील घटक आणि लोकप्रतिनिधी असे सारे घटक एकत्रित येतील, या दिशेने सर्वाधिक प्रयत्न करणे, गरजेचे आहे. ह्यांपैकी कित्येक उपक्रम मी लातूर जिल्ह्यातील देवणी इथे असताना देखील राबविलेले आहे.  ‘यश कल्याणी’ नावाची एक एन जी ओ आहे. त्यांनी उत्कृष्ट सायन्स वॉल स्पर्धा घेतली. त्यामुळे, स्पर्धात्मक असे  स्फूर्तिदायक वातावरण तयार झाले.  शास्त्रज्ञाच्या माहितीचे एकत्रीकरण करण्याकरिता एका शिक्षकाने क्यू आर कोड तयार केला.”

“बारामती ला सायन्स इनोव्हेशन सेंटर चे उद्घाटन करण्यात आले तेव्हा भरविण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनी मध्ये सायन्स वॉल उभारण्यात आले होते. कोंढार चिंचोली इथल्या शाळेत उभारलेला पृथ्वी मिसाईलचा प्रोटोटाईप तिथे नेण्यात आला. अगदी इनोव्हेशन सेंटर च्या पुढ्यात उभारण्यात आला. तिथे आलेल्या कितीतरी विद्यार्थ्यांना त्यातून नक्कीच प्रेरणा मिळाली असेल. मला आलेला अनुभव सांगतो. सायन्स वॉल कशी झालीय हे पाहायला मी गेलेलो असताना एका शाळेतील विद्यार्थिनीने मला एक प्रश्न विचारला, – सर, इथे अठ्ठावीस शास्त्रज्ञ  आहेत.. त्यांमध्ये एकच महिला मेरी क्युरी आहेत.. असे कां? ह्या अशा प्रश्नांतूनच मग, अशा प्रश्नांची उत्तरे शोधायची सुरुवात होते. तिला असा प्रश्न वयाच्या दहाव्या वर्षीच पडला त्याकरिता आवश्यक परिस्थिती निर्माण करण्यात आम्ही यशस्वी झालो, हे महत्वाचे आहे.’

‘अशा विविध स्वरूपाच्या, अनोख्या आणि भन्नाट वाटाव्यात अशा कल्पना सुचतात तरी कुठून ? या प्रश्नावर श्री राऊत सांगतात, “महाराष्ट्राच्या विविध भागांत काम करताना त्या त्या प्रदेशांनी विविध कल्पना सुचविल्या . त्यातील काही डोक्यात, काही कागदांवर आणि काही प्रत्यक्षात राबविता आल्या. अवघ्या आठ वर्षात केलेले छोटे मोठे  प्रयोग समाधान देऊन जातात. ह्या व्यापक व्यवस्थेत एक ‘चेंज एजेंट’ या नात्याने आपण काही भर घालू शकलो, अशी सार्थकता वाटते.’

जिल्हा परिषद सरकारी नोकरीत असून  कल्पकता आणि आशावाद न सोडता, अधिकारीपणाचा अहंभाव मनाला स्पर्श देखील ना करू देता,   नवनवीन उपक्रम जिद्दीने राबवून दाखविणाऱ्या तसेच स्वतः जीव ओतून काम करीत इतरांनाही कृतीद्वारे प्रेरित करणाऱ्या या अधिकाऱ्याला ‘इंडिया इनपुट’ टीम चा सलाम.

(All Images: Karmala Panchayat Samiti, Solapur District)

Editor India Input

I am a senior journalist. Have reported and edited in print, tv & web, in English, Hindi & Marathi for almost three decades. Passionate about extraordinary positive works by people like you and me.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

two × 4 =

Back to top button