मराठी

Samruddhi Mahamarg: अपघात कां घडताहेत? ते कसे टाळता येतील?

प्रवेशा आधी निष्काळजी वाहन चालकांचे प्रबोधन अत्यावश्यक ! 'इंडिया इनपुट' च्या टीम ने केला समृद्धी महामार्गावर पाहणी सर्वे, त्यातून निघालेला निष्कर्ष !

Samruddhi MahamargSamruddhi mahamarg (हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग) हा मुंबई आणि नागपूर ह्या दोन शहरांना जोडणारा एकूण ७०१ किलोमीटर लांबीचा महामार्ग असून ह्यापैकी नाशिक जिल्ह्यापर्यंत महामार्गाची बांधणी पूर्ण होऊन रहदारी सुरु झालेली आहे. ह्या वर्षी उर्वरित काम पूर्ण होऊन नागपूर ते मुंबई कनेक्टिविटी सुरु होईल अशी अपेक्षा आहे. मात्र, चिंताजनक बाब अशी, की आता ह्या महामार्गावर रस्ते अपघाताच्या घटना वारंवार घडत असून जीवित हानी सुद्धा होत आहे. त्याकरिता आधी झालेल्या अध्ययनातून काही कारणे समोर आली होती. मात्र, इंडिया इनपुट च्या टीम ने अलीकडे मे आणि जून २०२३ ह्या कालावधीत ह्या महामार्गाची पाहणी केली आणि वाहन चालक, ग्रामस्थांशी तसेच अन्य संबंधितांशी चर्चा केली. सर्व ठळक निष्कर्ष इथे मांडण्यात आले आहेत. 

(इंडिया इनपुट टीम)

Samruddhi mahamarg वर अपघातांची मालिकाच जणू घडत आहे. ह्या विषयावर काही नेते आणि काही मंडळी देखील चक्क राजकारण करीत असून इतक्या प्रयासांती जनतेकरिता महामार्ग उभारला ती जणू चूकच केली अशा आशयाचे पुरोगामीपणाला अजिबात ना शोभणारे विधान करीत आहेत.

Samruddhi Mahamarg
देखणा समृद्धी महामार्ग महाराष्ट्राचीच नव्हे, तर देशाची शान आहे!

मात्र अधिकांश अपघातांना वाहन चालविणाऱ्या चालकांचा निष्काळजीपणा बऱ्याच अंशी कारणीभूत असून महामार्गावर प्रवेश करण्याआधी त्यांचे प्रबोधन करणे अत्यंत आवश्यक आहे. इंडिया इनपुट टीम ने मे आणि जून २०२३ ह्या महिन्यांत समृद्धी महामार्गावर पाहणी केली, ड्रायव्हर्स, प्रवाशी, तसेच ग्रामस्थांशी चर्चा केली, स्वतः टीम सदस्यांनी पाच वेळा प्रवास केला आणि हकीकत जाणून घेतली. ह्यात वाहन मालक आणि चालकांचा निष्काळजीपणा हे महत्वाचे कारण पुढे आले.

‘इंडिया इनपुट’ च्या टीम कडून टायरचे वय, टायरची शक्ती आणि टायर प्रेशर संबंधी प्रश्नांना अधिकतर चालकांनी बगल दिली. कित्येक मोठ्या वाहन चालकांनी, विशेषतः ट्रक चालकांनी टायर प्रेशर बाबत निष्काळजी पण दर्शविला. आपल्या वाहनात असलेले टायर कधी विकत घेतले होते, ते किती जुने आहेत ह्या प्रश्नांवर त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही.

Samruddhi mahamarg
समृद्धी महामार्गावर अधूनमधून अशा अवजड वाहनांचे दर्शन घडत असते. (image: India Input)

मार्गिका बदलणे अर्थात लेन क्रॉसिंग विषयी वाहन चालकांचा निष्काळजी पणा समोर आला. महामार्गावर अधिकतम वेग मर्यादा १२० किमी ताशी आहे. तसेच दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर ठेवून मार्गक्रमण करायचे बंधनकारक आहे. पण, कित्येक वाहने विशेषतः वॅगन आर, स्विफ्ट, सॅन्ट्रो आदी लहान चारचाकी वाहने वेगाने येऊन ओव्हरटेकिंग करत असल्याचे आढळून आले. दोन लहान कार चालकांशी ह्याविषयावर चर्चा केली असताना त्यांनी आडमुठे धोरण दर्शवित “आम्हाला वेगाने चालविता येते म्हणून चालवतो” किंवा “वेग मर्यादा घालायची होती तर महामार्ग बांधला कशाला?” असे सवाल देखील केले. क्रेटा, टाटा नेक्सन आणि अन्य काही एस यू व्ही वाहन चालकांनी अत्यंत बेदरकार पणे लेन क्रॉस केल्याचे आणि अवजड वाहनाना अचानक ओलांडून पुढे गेल्याचे दृष्टीस पडले.

उच्च पदावर नोकरीस असलेल्या तरुणाने मागील दौऱ्यात आपण वेग मर्यादा तोडल्याने नंतर बारा हजार रुपयांचे चालान आल्याचे आणि ते भरावे लागल्याचे प्रांजळपणे सांगितले.

एकूण, इंडिया इनपुट च्या पाहणीत वाहनांना महामार्गावर प्रवेश करण्या आधी चालकांचे संक्षिप्त प्रबोधन करणे आणि त्यांच्या वाहनांची अचानक तपासणी (सरप्राईज चेक) करणे योग्य राहील, असा निष्कर्ष समोर आला.

मुख्य म्हणजे ना. श्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी देखील शनिवारी पत्रकारांशी बोलताना ह्यापुढे महामार्गावर प्रवेश करण्याआधी वाहन चालकांचे प्रबोधन करण्यात येईल असे सांगितले.

१ जुलै चा भीषण अपघात !

Samruddhi Mahamargअर्धरात्री नंतर सुमारे एक वाजून पस्तीस मिनिटांनी (शनिवार १ जुलै २०२३ रोजी) समृद्धी महामार्गावर बुलढाण्यानजीक एका खाजगी बसला अपघात झाला ज्यात २५ प्रवाशांचा जळून मृत्यू झाला.

शनिवारी सकाळी ‘इंडिया इनपुट’ च्या टीम ने घटनास्थळी भेट दिली तेव्हा बस दुर्घटनेची दाहक भीषणता स्पष्ट झाली. आमच्या टीम कडून फोटो घेण्यात आले तेव्हा देखील जळून कोळसा झालेल्या बस मधून हलका धूर बाहेर येतच होता. पोलिसांनी सांगितल्यानुसार, एकूण ३३ लोकांना घेऊन निघालेली बस महामार्गावरील पिंपळखुटा नजीक विजेच्या खांबाला धडकली त्यानंतर, बस ची डिझेल टॅंक रास्ता दुभाजकाला लागून फुटल्याने बस पालटली आणि आग लागली. बस मधील दोन चालकांपैकी बस चालविणारा चालक सहीसलामत वाचला. आठ जणांनी बसच्या काचा फोडून जीव वाचविण्यात यश मिळवले.

आधी सांगण्यात आल्याप्रमाणे ‘विदर्भ ट्रॅव्हल्स’ च्या नागपूर पुणे बसची टायर फुटल्याने बसने मार्गिकेला धडक दिली आणि बस पालटली. त्यावेळी बाहेर पाडण्याचे द्वार बस खाली आल्याने बाहेर पडणे कठीण झाले. अपघातात काच फोडून बाहेर पडलेल्या प्रवाशाने सांगितले, कि तो बाहेर येताच बस मध्ये स्फोट झाला आणि बसने पेट घेतला. मात्र त्यानंतर काही सूत्रांनी टायर फुटल्याचा प्रकार घडलाच नसावा अशी शक्यता व्यक्त केली.

Samruddhi Mahamarg
बसचा सांगाडा जळून अक्षरशः कोळसा झाला !

ह्या अपघातातून सही सलामत बचावलेल्या ड्राइव्हर चा जवाब पोलिसांनी नोंदवला असून हा अपघात आहे की घातपात- अपघाताचे खरे कारण पोलीस चौकशीतून पुढे येईल. मात्र, आजपर्यंत ह्या महामार्गावर घडलेल्या अपघातांपैकी हा सर्वात भीषण होय!

उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी अपघातातील मृतांची ओळख पटविण्याकरिता डी एन ए टेस्टिंग करण्यात येईल तसेच महामार्गावर सुरक्षा सिस्टम लावण्यात येईल असे सांगितले आहे.

अपघातांची मालिका

चिंताजनक बाब अशी, की आकडेवारी नुसार, Samruddhi mahamarg वर डिसेम्बर २०२२ ते मार्च २०२३ ह्या काळात ९०० अपघात घडले ज्यात ३१ जण प्राणांस मुकले आहेत.  महामार्गावर प्रत्येकी तीन पदरी दोन स्वतंत्र ट्रॅक असल्याने समोरासमोर वाहनांची धडक बसण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र, अन्य काही कारणांमुळे अपघात घडण्याचे प्रकार सुरूच आहेत.

अध्ययनात आढळलेली कारणे

विश्वेश्वरैय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजी (VNIT) तर्फे ह्याच प्रश्नाचे उत्तर शोधण्या करिता अलीकडे एक स्टडी सर्वे करण्यात आला होता. ट्रान्सपोर्ट विभागाच्या काही विद्यार्थ्यांनी प्रोफेसर विश्रुत लांडगे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्गाच्या सुमारे शंभर किलोमीटर परिसरातील स्ट्रेचवर चार महिने संशोधन केले. त्यात समृद्धी महामार्गावर अपघात होण्यामागे प्रामुख्याने चार कारणे आढळून आली होती. ती कारणे अशी:

टायर फुटणे (tyre burst), लेन बदलणे (lane changing), प्राणी आडवे येणे (animal crossing), महामार्ग संमोहन किंवा मती गुंग होणे (highway hypnosis).

चालकांचा निष्काळजीपणा: टायर प्रेशरने टायर फुटणे!

महामार्गावर सतत कितीतरी तास वाहन वेगाने धावत असल्याने टायरची हवा प्रसरण पावते आणि टायर प्रेशर मध्ये वाढ होते. जगभरात उष्ण कटिबंधातील देशां मध्ये तर हि सामान्य बाब आहे. मात्र, अशावेळी आधीच टायर प्रेशर तपासून घेतलेले नसेल तर वाढलेल्या टायर प्रेशरने टायर फुटून वाहनाचा तोल जाण्याचा प्रकार घडतो. दिल्ली ला जाणाऱ्या यमुना एक्सप्रेस वे वर ह्या कारणाने कितीतरी अपघात घडले आहेत. मात्र, इंडिया इनपुट च्या पाहणीत कितीतरी ड्रायव्हर्स ना नेमक्या टायर प्रेशरची माहिती नसल्याचे समोर आले आहे. काही ट्रक ड्रायव्हर्स नी “सगळे ठाऊक आहे, आम्हाला काही फरक पडत नाही” अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र “आपल्या टायर मध्ये किती प्रेशर आहे ते सांगा, आम्ही आपल्यासमोर चेक करू” असे सांगितल्यानंतर त्यांनी आपल्याला माहिती नसल्याचे कबूल केले.

चालकांचा निष्काळजीपणा: अनावश्यक पणे मार्गिका (लेन) बदलणे!

Samruddhi Mahamarg
अवजड वाहने सुद्धा अचानक लेन क्रॉस करून, आपला वेग वाढवून इतरांना आश्चर्याचे धक्के देतात.

समृद्धी महामार्गावर १२० किमी प्रति तास ह्या अधिकतम वेग मर्यादेचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच, दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे देखील अनिवार्य आहे. ओव्हरटेक करताना फास्ट लेन वापरणे तसेच नॉर्मल स्पीड लेन मध्ये अवजड वाहनांनी चालणे अपेक्षित आहे. मात्र, तरीही कसलेही ठोस कारण दिसत नसताना अचानक आपली मार्गिका (लेन) बदलून दुसऱ्या मार्गिके मध्ये प्रवेश करण्याचे प्रकार सर्रास दिसतात. विशेषतः वेगात वाहने चालवून इतर वाहनांना ओव्हरटेक करण्याचे खूळ शिरल्याने काही वाहन चालक महामार्गावर जीवघेणी वेग स्पर्धा करीत असल्याचे दिसून येते.

प्राणी आडवे येणे

समृद्धी महामार्गाला लागून असलेल्या ग्रामीण आणि जंगली भागात पाळीव प्राणी आणि जंगली प्राणी इत्यादींचा वावर आहे. ग्रामीण भागातील कुत्रे, गाई, म्हशी आदी प्राणी महामार्गावर येऊ नये ह्याकरिता काळजी घेण्यात आली आहे. मात्र, काही ठिकाणी गावातील कुत्री किंवा जंगलातील प्राणी रस्त्यावर आढळून आली आहेत. विशेषतः रात्री जंगली श्वापदे रास्ता क्रॉस करताना आढळून आल्याचे काही ड्रायव्हर्स कडून सांगण्यात आले आहे. अचानक वाहनासमोर एखादा कुत्रा किंवा अन्य प्राणी आल्याचा अनुभव हि काही ड्रायव्हर्सना आल्याचे समजते. अशावेळी त्यांना धडक लागू नये किंवा वाहनाला आणि प्रवाशांना इजा होऊ नये ह्या उद्देशाने वेगात जाणाऱ्या वाहनांच्या ड्रायव्हर्स कडून चुका संभवतात. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱयांचा असा दावा आहे, की
महामार्गाची योजना आणि बांधणी करताना प्राण्यांचा वावर होऊ नये या उद्देशाने उपाय करण्यात आलेले आहेत. तरीही प्राणी महामार्गात आडवे येत असतील तर त्याकडे तातडीने लक्ष पुरविण्याची गरज आहे.

मती गुंग होणे

महामार्ग संमोहन म्हणजे हायवे हिप्नोसिस ! महामार्गावर बराच वेळ वाहन चालविल्यावर मती गुंग होण्याचे किंवा भ्रमित होण्याचे प्रकार म्हणजे महामार्ग संमोहन. बराच वेळ गतीने वाहन चालवीत असताना शरीराची हालचाल स्थिर असते आणि मेंदू देखील जाड झाल्यासारखा होतो. विचार करण्याची शक्ती सुद्धा स्थिर झाल्यासारखी होते. अशावेळी, अचानक आवश्यकता पडली तर मेंदूला त्वरित प्रतिसाद देणे, तातडीने रिऍक्ट करणे अवघड होते. व्ही एन आय टी च्या अध्ययनात आढळून आले होते की ३३ टक्के अपघात महामार्ग संमोहनामुळे घडले आहेत. असेही आढळून आले आहे, की समृद्धी महामार्गावर रात्रीचा प्रवास सुरक्षित असून सकाळी आठ ते दहा वाजता ची वेळ ड्रायव्हिंग करीत अधिक धोकादायक आहे. ह्याच काळात काही ड्रायव्हर्स ची मती गुंग होत असल्याचे निदर्शनास आले होते. रात्रीच्या प्रवासा नंतर सकाळी वाढत जाणारा सूर्यप्रकाश आणि त्याचा दृष्टी ला सराव होण्याला लागणारा वेळ सुद्धा ह्या पैकी काही अपघातांमागे कारणीभूत असल्याचे समोर आले होते.

Samruddhi mahamarg : उज्वल भविष्याकरिता !

Samruddhi mahamarg नागपूर- वर्धा- अमरावती – वाशीम- बुलढाणा – जालना- औरंगाबाद- नाशिक- अहमदनगर-ठाणे ह्या जिल्ह्यांना जोडणारा प्रकल्प आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या मागास भागांची आर्थिक उन्नती साधली जावी, येथील कृषी उत्पादने आणि औद्योगिक विकासासाठी थेट मुंबई ला आणि विशेषतः जे एन पी टी (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट) च्या माध्यमाने समुद्राशी जोडणारा हा प्रकल्प असून त्याच उद्देशाने तत्कालीन मुख्यमंत्री ना. श्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी ह्या महत्वाकांक्षी प्रकल्पाची संकल्पना मांडली आणि ती तडीस नेली. मुख्य म्हणजे फडणवीस मंत्रिमंडळात महामार्ग सार्वजनिक प्रकल्प (एम एस आर डी सी)
मंत्री ह्या नात्याने जिद्दीने ह्या महामार्गाकरिता प्रत्यक्ष शेतकरी, ग्रामीणांशी भेटून, भू अर्जन (लंड ऍक्वीजिशन) चा संकल्प तडीस नेणारे नामदार एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री आहेत. ह्या महामार्गाचे डिसेम्बर २०२२ मध्ये लोकार्पण होण्या आधी उभयतांनी महामार्गाचा प्रत्यक्ष फेरफटका मारला होता, हे उल्लेखनीय.

राज्याच्या आणि देशाच्या उज्वल भविष्याकरिSamruddhi Mahamargता महामार्ग आवश्यक आहेत. पण त्यांचा नेमका वापर कसा करावा हे आम्हा सर्वानी आधी समजून घेतले पाहिजे आणि प्रत्यक्ष वागणुकीत ते स्वीकारले आणि अंगिकारले पाहिजे.

Related link:

https://mahasamruddhimahamarg.com/

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

17 − 3 =

Back to top button