Samruddhi Mahamarg: MSRDC अधिकारी जरा ऐकतील काय?
जाहिरात फलक, टी -फूड पार्क्स चे बघावे. MSRDC अधिकाऱ्यांनी वाहन चालकांचे ऐकावे!

Samruddhi Mahamarg समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरु आहे. त्यामागे विविध कारणे असली तरी लांब अंतरापर्यंत सतत वेगाने वाहन चालविताना शरीर आणि मनाची हालचाल स्थिरावल्याने अचानक मति गुंग होण्याचे किंवा मेंदूला डुलकी लागण्याचे प्रकार घडत आहेत. ह्याला ‘हायवे हिप्नोसिस’ असे वैद्यकीय भाषेत नाव असून समृद्धी महामार्गावर अपघातांचे ते सर्वात मोठे कारण समजले जात आहे. आता हा महामार्ग बांधणाऱ्या एम एस आर डी सी (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) ह्या सरकारी एजन्सीने त्यावर ध्वनिक्षेपक ,रॅम्ब्लर स्ट्रिप्स, रंगीत झेंडे इत्यादी बसविण्याचा उपाय शोधून काढला आहे.
डॉ. नम्रता मिश्रा तिवारी
३० जून आणि १ जुलै च्या मधील रात्री ‘समृद्धी हायवे’ वर खाजगी ट्रॅव्हल्स च्या बस ला अपघात होऊन किमान २६ लोकांचा दुर्दैवी मृत्यू ओढवला. हि बस रस्त्याशेजारच्या खांबाला आणि नंतर दुभाजकाला धडकल्याने पालटली आणि डिझेल टाकी फुटून आग लागली.
ह्या घटने मागे नेमके कारण कोणते ते शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. बस चालकाचा जवाब पोलिसांनी नोंदवून घेतल्याची माहिती आहे. बस चालकाने दावा केला आहे की बसचे टायर फुटल्याने बस वरील ताबा सुटला. आता पोलीस त्याच्या सी डी आर (कॉल डिटेल रेकॉर्डस्) ची तपासणी करीत असल्याची माहिती आहे. पोलिसांना शंका आहे, की तो खरी माहिती लपवीत असून तो अपघात घडला त्यावेळी तो फोन वर बोलत असावा आणि त्याची नजरचूक होऊन घटना घडली असावी.
‘हायवे हिप्नोसिस’ वर उपाय सापडला?
‘हाय वे हिप्नोसिस’ म्हणजे दीर्घ काळ वेगाने ड्रायव्हिंग करून बराच अंतर कापल्यावर शारीरिक आणि मेंदूची फारशी काहीच हालचाल होत नसल्याने मेंदूला जडपणा येणे, डुलकी येणे किंवा गुंगी लागणे. अशा वेळी चालकाचा ताबा सुटतो आणि अपघात घडत असताना देखील चालकाला त्वरित प्रतिसाद देणे अवघड जाते. डिसेम्बर २०२२ ला उदघाटन झाल्यापासून एप्रिल २०२३ पर्यंत २७ टक्के अपघात ह्याच कारणांमुळे झाले असे सांगितल्या जाते.
ह्यावर तोडगा म्हणून, आता एम एस आर डी सी अधिकाऱ्यानी पी ए एस प्रणाली चा उपाय पुढे केला आहे.
पी ए एस म्हणजे काय?
पी ए एस अर्थात पब्लिक ऍड्रेस सिस्टिम म्हणजे सार्वजनिक स्वरूपात जनतेला उद्देशून उद्घोषणा करण्याची व्यवस्था असते. ह्यात ऑडिओ ऍम्प्लिफायर, लाऊड स्पीकर आणि मायक्रोफोन अशी रचना असते. कोणत्याही रेल्वे स्थानकावर रेल्वे गाड्यांची वेळ आणि प्लॅटफॉर्म क्रमांक सांगणारी उद्घोषणा आपण ऐकली आहे, ती अशा प्रकारची सिस्टम वर आधारित असते.

महामार्गावर एन्ट्री आणि एक्झिट पॉईंट्स आहेत जिथून वाहने समृद्धी महामार्गावर प्रवेश करतात किंवा तिथून महामार्ग सोडून बाहेर पडू शकतात. हे पॉईंट्स सामान्यतः महामार्गावर लगतच्या महत्वाच्या शहरांजवळ आहेत. जसजशी ती पॉईंट्स जवळ येऊ लागतात, साईन बोर्डांद्वारे वाहन चालकाला ते किती दार आहेत ह्याची माहिती मिळत जाते. ह्या पॉईंट्स वर आता पी ए एस व्यवस्थेद्वारे सूचनांचे प्रक्षेपण केले जाणार आहे.
कितपत यशस्वी ठरणार?
मुंबई पुणे महामार्गावर देखील अशा प्रकारची पी ए एस व्यवस्था सध्या कार्यरत आहे. त्यामुळे, हि व्यवस्था समृद्धी वर देखील उपयोगी ठरेल असा अधिकाऱ्यांना विश्वास वाटतो आहे. मात्र, ह्यावर शंका घेण्यास पुरेशी कारणे देखील आहेत.
मुंबई पुणे महामार्गावर थोड्या थोड्या अंतरावर वाहनांना हायवे च्या शेजारी घेऊन जाण्याला ‘ले बेयज’ आहेत जिथे गतीने येणाऱ्या वाहनांचा त्रास नसतो आणि आरामात वाहन पार्क करून सुस्ती घालवता येते, खाली उतरून हात पाय मोकळे करायला, आवश्यक फोन घ्यायला किंवा फोन कॉल करायला तसेच शीण घालवायला आणि तणाव दूर करायला मदत होते. मात्र, वाहन चालकांची तक्रार अशी आहे की “समृद्धी महामार्गावर ले बेयज कमी दिसतात आणि त्यांच्या येण्या आधी साईन बोर्ड्स नजरेत येत नाहीत. ते पुढे आहेत हे चटकन समजून येत नाही. त्यामुळे, ले बेयज मागे राहतात आणि गाडी वेगात पुढे गेल्यावर लक्षात येते. तेव्हा, मागे यू टर्न घेण्यात बराच वेळ जातो आणि म्हणून, तो तसा घेऊन येण्याचा प्रश्नच राहत नाही.”
जाहिरात बोर्ड आणि हिरवी झाडे नाहीत.

‘इंडिया इनपुट’ च्या पाहणी सर्वे दरम्यान आणखी एक तक्रार वाहनचालकांनी केली ती म्हणजे हे महामार्ग नवीन असल्याने दूर पर्यंत हिरव्या साईन बोर्डांशिवाय काही दिसत नाही. जाहिरात फलक तर नाहीच नाहीत आणि महामार्गालगत फारशी झाडे हि नाहीत. तिकडे, मुंबई पुणे महामार्गावर थोड्या थोड्या अंतरावर जाहिरात बोर्ड्स, जाहिरात फलक आदी आहेत. त्यामुळे, अन्य वाहने असली काय आणि नसली काय, वाहन चालकाला एकटे एकटे फील होत नाही.
वाहन चालक सांगतात, की “समृद्धी महामार्गावर दूर पर्यंत तीच स्काय लाईन आणि तीच हिरवी साईन बोर्ड्स बराच वेळ पाहून नजर कंटाळते. रात्री तर आजूबाजूला महामार्गाशिवाय फारसे काही दिसत नाही. त्यामुळे कंटाळा वाटतो.”
शीण घालवायचा कुठे?
शिवाय, आणखी एक तक्रार अशी की समृद्धी महामार्ग नवीन असल्याने तिथे रेस्टारेंट्स, एखादा ढाबा सहसा दिसत नाहीत. पान स्टॉल्स आदींची संख्या देखील फार कमी आहे. समृद्धी महामार्गावर फूड पार्क्स देखील दिसत नाहीत. त्यामुळे, शीण घालवायला, थोडा वेळ चहा, सिगारेट शौकिनांना विरंगुळा करायला फारसं मिळत नाही.
एम एस आर डी सी सूत्रांचे म्हणणे आहे, की आम्ही प्रत्येक २५ किमी अंतरावर ‘रम्बलर्स स्ट्रिप्स’ स्थापन करण्याची योजना हाती घेत आहोत. ‘रम्बलर्स स्ट्रिप्स’ म्हणजे त्यावरून जाणाऱ्या वाहनांना रम्बलिंग साऊंड चा ध्वनी संकेत आणि वाहनांना प्रत्यक्ष व्हायब्रेशन्स देण्याची यांत्रिक प्रणाली. ह्या शिवाय, नजरांचा कंटाळा घालविण्यासाठी रंगीत झेंडे आणि रिफ्लेक्टर्स सुद्धा लावण्याची योजना असल्याचे समजते. पूर्वी घोषणा केल्या प्रमाणे ३३ लाख वृक्षांचे रोपण करण्याची योजना अजून वास्तवात उतरायची आहे. पाहू या काय काय आणि कधी पर्यंत होते. माननीय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे ह्यांचे इकडे खास लक्ष असल्याने हे सारे लवकर घडेल अशी आशा आहे.
तेव्हा, अधिकाऱ्यांना लक्ष घालून समृद्धी वर अशा प्रकारे काही सुधारणा करता येतील. निव्वळ एन्ट्री- एक्झिट वर ध्वनिक्षेपकद्वारे सूचनांचे प्रक्षेपण करण्याची योजना कितपत यशस्वी ठरेल हे येणार काळच ठरवेल.