मराठी

AC sleeper busses: बसेस की धावणाऱ्या कॉफिन्स? RTO हे वाचा!

खाजगी बस ने प्रवास करताय? त्यांना आधी हे प्रश्न विचारून घ्या!

AC sleeper busses त्यांच्या वर्तमान स्थितीत कितपत सुरक्षित आहेत? प्रवाशांचा जीव धोक्यात घालायचा नसेल तर, त्यांचेवर बंदी घालणेच योग्य ठरणार नाही का? अलीकडे समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात २६ जणांचा जीव गेला. त्या घटनेतून कितीतरी प्रश्न उभे झाले. त्या प्रश्नांचा सखोल मागोवा घेणारा हा लेख.

संजय रमाकांत तिवारी

AC sleeper busses
AC sleeper double decker busses are in the eye of a storm due to their involvement in various accidents.

विमान प्रवासा दरम्यान आपली फ्लाईट टेक ऑफ होण्या आधी विमानात आपल्याला आपात्कालीन स्थितीत काय करायचे, कसे वागायचे त्या विषयी माहिती देण्यात येते. एक्झीट डोर्स आणि ऑक्सिजन मास्क बद्दल सांगण्यात येतं. तसंच  सगळ्या लांब पल्ल्याच्या, रात्री प्रवासाच्या बसेस मध्ये प्रवाशांना सुरक्षे संबंधी सांगणं आणि एक्झीट ची दारे कोणती आहेत ते कुणीच कधीच सांगत नाही. संकट समयी कुठून आणि कसे बाहेर पडायचे, प्रवाशांना ह्याची माहिती देण्याचा विचार ही खाजगी ट्रॅव्हल्स वाल्यांना  आजतागायत शिवलेला नाही. कुठे तरी तसा नियम असू नये काय? नसल्यास, तो करण्यात येऊ नये काय? त्याची तातडीने अंमलबजावणी करणे आवश्यक नाही काय?

तसेच, आपात्कालीन स्थितीत काचेच्या खिडक्या म्हणजे ग्लास विंडोज उघडण्या साठी हैमर्स (हातोडी) असतील काय, त्या कुठे ठेवण्यात आले आहेत ते दाखविण्याचे अजून पर्यंत तरी अनिवार्य कां करण्यात आलेले नाही, हा प्रश्न कायम आहे.
आता, बुकिंग आधी हे प्रश्न विचारा..!
खाजगी बसेस मध्ये तिकीटाचे बुकिंग करण्याआधी प्रवाशी काय विचारतात? “तुमच्या बस चा ए सी नीट काम करतो ना, आम्हाला स्वच्छ पांघरूण मिळेल की आम्ही घरून आणायचे, व्हिडिओ स्क्रीन एकच आहे की प्रत्येक प्रवाश्याच्या सीटवर एक आहे, स्वच्छ नवीन इअर फोन्स देणार आहात ना की ते सुद्धा आम्हीच आणायचे, रात्री किती वाजता आणि कुठे स्टॉप असेल?”
बस मध्ये समोर जागा नसेल आणि मागील सीट उपलब्ध असेल तर “झटके बसतील काय, किती व्हील्स आहेत मागे, बस चे कोणते मॉडेल आहे, व्होल्व्हो आहे का दुसरी कोणती,” इत्यादी प्रश्न लगेच करतात.
हे प्रश्नच सांगतात की आम्ही आपला आराम, कंफर्ट वगेरे ला अधिक प्राधान्य देतो. त्यावर प्रवाशांची बाजू पण योग्यच आहे. ते म्हणतात,
“आम्ही रूपये मोजतो ना, मग आम्हाला आरामदायक प्रवास हवा, अशी साधी आम्ही अपेक्षा केली तर चुकले कुठे?”
स्लीपर कोच की धावती कॉफिन?
AC sleeper Busses
Inside view of an AC sleeper double decker bus (image: Quora)

अर्थात् ते चूक नाही. पण, अधिक योग्य ठरेल जर त्यात काही प्रश्न जोडली आणि पूर्वीच्या प्रश्नांच्या आधी ही विचारली तर. उदाहरणार्थ, प्रवास करत असलेली बस स्लीपर कोच असेल तर तुम्हाला इच्छा असो वा नसो, प्रवास भर सतत पडून राहावे लागते. तिथेच तुमची अत्यावश्यक सामान असलेली बॅग, पाण्याची बॉटल वगेर तुम्ही ठेवलेले असते. अशावेळी, तुम्हाला हालचाल करण्यासाठी देखील पुरेशी जागा उरत नाही. रात्रीचा प्रवास असल्याने दिवे (लाईट्स) मालावलेले असतात. तुम्ही पडद्यामागे असल्याने तुम्हाला अंधारात फारसे दिसण्याची शक्यता नसते. अशा वेळी शक्य आहे, की दुर्दैवाने अपघात झाला तर तुम्ही त्याच जागेवर फसून (pinned अवस्थेत) राहू शकता. स्लीपर कोच मधील तुमच्या जागेवरून निघून सरपटत किंवा उभे राहून अंधारात आणि कोलाहलात तुमचे एक्झिट दारा पर्यंत जाणे कोणत्याही अग्निदिव्यापेक्षा कमी नाही. तुमच्या आजूबाजूला तुमच्या पेक्षा सशक्त व्यक्ती असतील तर विंडो ग्लास फोडून आधी ते सुरक्षित बाहेर पडण्याची शक्यता अधिक असू शकते.

ह्या वातानुकूलित स्लीपर कोच बसेस च्या आतील ले आऊट मध्ये आमूलाग्र बदल करून त्यांना अधिक सुरक्षित बनविणे किंवा महामार्गावर अशा बसेस वर बंदी आणणे हेच दोन पर्याय आता शिल्लक आहेत.
खाजगी ट्रॅव्हल्स वाल्यांना आणखी काही प्रश्न विचारून प्रवासी आपला जीव वाचवू शकतात. उदाहरादाखल,
– प्रवास करणार त्या बस ला किती आपत्कालीन म्हणजे इमर्जन्सी एक्झिट दारे आहेत? बसच्या ले आऊट प्लॅन मध्ये ती एक्झिट दारे दाखवाल काय? ती एक्झिट दारे ऐनवेळी जाम होणार नाहीत, ह्याची काळजी घेतली आहे ना? प्रवासाला निघण्यापूर्वी ही तमाम माहिती आम्हा सर्व प्रवाशांना कोण सांगेल? त्याकरिता कुणाची नियुक्ती केली आहे?
AC sleeper Busses
The fancy look can be deceptive. (image: Quora)

– आपत्कालीन परिस्थितीत विंडो ग्लास मधून एक्झिट घ्यायची असेल त्या परिस्थितीत उपयोग होईल असे हैमर्स कुठे उपलब्ध असतील?

– प्रवासाला निघण्यापूर्वी बस मध्ये ते सांगण्यात येईल ना?
-बस च्या चालक केबिन मध्ये तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरा बसवला आहे काय? तुम्ही तुमच्या कार्यालयात emergency control room म्हणजे आपत्कालिन कक्ष स्थापन केला आहे का? त्याचा दूरध्वनी क्रमांक काय?
बस चालकांची पुरेशी झोप झालीय का?
-आम्ही जाणार त्या बसचे किती चालक असतील, दोन असतील ना की एकच जण पूर्ण अंतर बस चालवेल? सायंकाळी बस वर येण्याआधी दिवसभर चालकांची पुरती झोप झालेली असेल ना? रात्री बस चालवणार असलेले चालक दिवसा दुसऱ्या बसवर किंवा अन्य कामावर तर नव्हते? -त्या बस चालकांची नावे, वय आणि चालविण्याचा अनुभव इत्यादी कळतील काय?
-त्या ड्रायव्हर पैकी कुणी बस चालवताना सिगारेट ओढणे, मोबाईल फोन वर बोलणे, किंवा व्हिडीओ पाहणे असे प्रकार तर करीत नाही? तसे केले तर तुम्ही काय ऍक्शन घेता?
-कुणी प्रवाशाने पांघरुणात लपून सिगारेट पेटवली तर तुमचा स्टाफ त्यावर काय ऍक्शन घेतो? तुमचा स्टाफ ऐकत नसेल, तर तुम्हाला किंवा तुमच्या कंट्रोल रूम ला अलर्ट करण्यासाठी कोणता 24×7 नंबर आहे? फीडबॅक देण्यासाठी कोणता नंबर किंवा WhatsApp क्रमांक आहे?
बसचे किती चालान झालेत? चालू फिटनेस सर्टिफिकेट दाखवाल? 
-बस चे टायर्स किती जुने आहेत, त्यातील टायर प्रेशर व्यवस्थित आहे की नाही ते आधी चेक करून घेणार ना?
– प्रवास करणार त्या बसने आणि त्यांच्या चालकांनी आधी नियमांचे उल्लंघन केले आहे काय, काही चालान झाले आहेत काय, कोणत्या बाबींसाठी? बसचा विमा आणि फिटनेस सर्टिफिकेट आता, इथे बघायला मिळतील काय?
 अलीकडेच समृध्दी महामार्गावर बुलढाणा नजिक एका खाजगी ट्रॅव्हल्स च्या बसला अपघात झाला त्या बस वर ही पूर्वी चालान झाले होते आणि पी यू सी ची मुदत संपून गेली होती, असे सांगण्यात येते. मुख्य म्हणजे अपघात घडल्यानंतर, काच फोडून केवळ आठ प्रवासी कसेबसे बाहेर पडू शकले आणि इतरांना बस ला लागलेल्या आगीत होरपळून अत्यंत क्लेशदायक मरण नशिबी आले. काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये  सर्वाधिक वेदनादायी बाब मांडण्यात आली आहे, ती अशी. त्या अपघात घडल्यानंतर जलद प्रतिसाद दल (क्विक रिस्पॉन्स टीम्स) आणि अग्निशामक दल (फायर ब्रिगेड) उशिरा पोहोचले. आधुनिक समृध्दी महामार्गावर जर ही वस्तुस्थिती असेल तर, त्यापेक्षा वेदनादायी दुसरे काय असू शकेल? MSRDC (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) ने ह्याची सत्यता तपासून पहावी.
एकच दार, काय करणार?
डबल डेकर ए सी लक्झरी स्लीपर कोच बसेसची सध्या प्रचंड चलती आहे. त्यांची लांबी साधारणतः दहा ते बारा मीटर असते. त्यात सुमारे छत्तीस प्रवासी येतात. बस एअर कंडीशंड आणि आरामदायक असते, वर प्रवासी कमी असल्याने तिकिटे देखील छान महाग असतात. सामान्यपणे अशा बसेस मध्ये वन बाय टू अरेंजमेंट असते. म्हणजे, वर खाली एका बाजूला प्रत्येकी सिंगल प्रवाशांची ओळ आणि दुसऱ्या बाजूला वर खाली  दोन दोन प्रवाशांची सोय. पण ह्या बसेस मध्ये प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी एकच दार असून ते ड्रायव्हर ची संमती असेल तेव्हा त्याच्या कंट्रोल ने उघडते किंवा बंद होते.
अन्य काही जुन्या पद्धतीच्या बस मध्ये साठ पर्यंत प्रवाशी येऊ शकतात.
आजकाल तसेही जवळ जवळ सर्वच खाजगी ट्रॅव्हल्स बसेस मध्ये आत प्रवेश करण्या साठी आणि बाहेर पडण्यासाठी एकच द्वार असते आणि ते सामान्यपणे समोर डाव्या बाजूला असते आणि ऑटोमॅटिक असून त्याचे नियंत्रण चालकाकडे असते. पण, सुमारे पस्तीस, साठ किंवा त्यापेक्षा अधिक प्रवाशांकरिता हे अत्यंत अपूरे आहे.

संकट समयी काच फोडून बाहेर पडता यावे, ह्या करिता हैमर्स म्हणजे हातोडी आवश्यक असतात. संकट समयी हाताशी हातोडी असेल तर सुटके करिता कमी वेळ लागतो. अशा हैमर्स काचेच्या पेटीत पण सर्व प्रवाशांना दिसेल आणि संकट समयी सहजगत्या काढता येईल, अशा ठिकाणी ठेवणे गरजेचे आहे.

प्रवासी परवान्यावर माल वाहतूक !
आयुष्याचा प्रवास आणि खाजगी बस च प्रवास ह्यात एक दोन साम्य स्थळे आहेत. तुम्ही कोणा बरोबर किंवा कशा बरोबर प्रवास करता हे तुम्हाला ठाऊक नसते आणि त्यांच्यामुळे तुमच्या सोबत काय घडेल, ह्याचा अंदाज नसतो.
प्रवास करत असलेल्या बस ला प्रवासी वाहतुकीचा परवाना असला तरीही कित्येक वेळा बसमध्ये मात्र मागे मालवाहतूक होते. तिथे प्रवाशांच्या बॅगा, सुटकेसेस तर असतातच, पण शिवाय, जे लोक त्या बस मधून प्रवास करत नाही आहेत अशांच्या पार्सल, माल आदींनी ती जागा आणि कित्येक बसेस मध्ये टपा वरील जागा देखील भरलेली असते. ह्यावर कुणाही कायदा पालन करणाऱ्या विभागाचा वचक किंवा नियंत्रण नाही. तो असता तर हे सर्रास घडले नसते. तो वचक नसल्याने चक्क अमली पदार्थ, स्फोटके किंवा शस्त्रास्त्रे आदींची ने आण सुद्धा ह्यातून कधीही घडविली गेली, तर नवल नाही. त्या मालवाहतुकी मुळे प्रवाशांना कसलाही त्रास झाला तर न्याय कुठे मागायचा?
प्रवासी बस द्वारे उघडपणे माल वाहतूक करणे फार पूर्वीपासून विनासायास सुरू आहे. हे कायदेशीर रित्या कितपत वैध आहे हे ट्रॅव्हल कंपन्यांचे मालक, वाहतूक पोलीस किंवा परिवहन खात्याचे आर टी ओ अधिकारी सांगू शकतील. मात्र, हे सांगणे त्यांना नक्कीच आवडणार नाही. त्या मल वाहतुकीद्वारे कोणत्या जिनसा, कोणता माल नेण्यात येतो हे ते देखील छाती ठोक पणे सांगू शकणार नाहीत. त्यातून ने आण होणाऱ्या माल आणि साहित्यांची तपासणी कोणते परिवहन किंवा वाहतूक अधिकारी करतात हे सुद्धा संबंधितांना सांगता येणार नाही. ह्याऊन अजब बाब म्हणजे प्रवासी वाहतुकीच्या नावावर सर्रास सुरू असलेल्या ह्या अवैध मालवाहतुकी साठी वेगळी व्यवस्था केली जाते. अगदी मालवाहतूक करणाऱ्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिक कंपनी प्रमाणे वेगळे एजंट नेमले जातात आणि गोदामे देखील वापरली जातात.
त्यांचा नफा, आपले जीवन – दोन्ही महत्वाचे!
AC sleeper Busses
AC sleeper Busses from inside (image: Coach Builders India)

खाजगी ट्रॅव्हल्स वाल्यांनी बसेस चालवून भक्कम नफा कमविण्यात काही गैर नाही. त्याचप्रमाणे, आपण प्रवाशी जर स्वतः जिवंत आणि सुस्थितीत राहण्याची इच्छा करीत असू तर त्यात काही चुकीचे नाही. तसे करण्यात काहीही गैर संवैधानिक नाही.

आपल्या आप्त स्वकियांना, मित्र मैत्रिणींना जिवंत आणि सुस्थितीत राखण्याची इच्छा करण्यात कसलीही चूक नाही.
त्याकरिता काही शंकांचे समाधान करून घेण्यात काय कुणाला हरकत नसावी. बरोबर?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

eighteen + one =

Back to top button