साधे प्रदर्शन नव्हे, हे तर खुले विद्यापीठच! चुकवू नका !
'ग्रामायण सेवा प्रदर्शनी' कां वेगळी अन सरस ठरते इतर प्रदर्शनांपेक्षा? 'ग्रामायण' ने अशी आयोजने देशाच्या प्रत्येक शहरांत घ्यावी.
अभिनव कल्पना आणि त्यावर आधारित प्रकल्प यांकरिता विख्यात आहे नागपूरस्थित ‘ग्रामायण’ !
या संस्थे तर्फे दर वर्षी आयोजित ‘ग्रामायण सेवा प्रदर्शनी’ त्यातील विविधांगी वैशिष्ट्यांमुळे ओळखली जाते.
ही प्रदर्शनी या वर्षी 22 डिसेंबर ते 26 डिसेंबर दरम्यान नागपूर येथील रामनगर मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.
येथील काही वैशिष्ट्ये..
(डॉ. नम्रता मिश्रा तिवारी)
ह्या विषयी ऐकले, पाहिले आहे काय?
ऑरगॅनिक रित्या उगवलेले खाद्य पदार्थ, नुसती डबी उघडली तरी घमघमाट होईल असे शुद्ध हिंग, कच्च्या घाणीचे अस्सल शेंगदाणे किंवा मोहरीच्या सुगंधाचा दरवळ असलेले खरेखुरे शुद्ध खाद्य तेल, रोगप्रतिकारक हळद कँडी, शुद्ध खडी साखर, सैंधव मीठ, तुळस अर्क, गोमूत्र अर्क, हर्बल पेस्ट कंट्रोल, स्थानिक रित्या उत्पादित हर्बल औषधी, त्यातून काढलेले तेल किंवा अर्क आणि तेल विरहित लोणची.. ही अशी प्रदीर्घ यादी ‘ग्रामायण सेवा प्रदर्शनी’ ची वैशिष्टये म्हणावी लागतील.
गडचिरोली येथील जंगलांतून आदिवासी बांधवांनी गोळा केलेला अस्सल नैसर्गिक जंगली मध, त्या मधाची चव चाखण्याची संधी, चारोळ्या, आणखी बराच रान मेवा, ऑरगॅनिक गुळ, त्या गुळाची पावडर, रसायने रहित गुळ कसा ओळखावा त्याची माहिती असं सारं काही येथील स्टॉल्स वर मिळतं. निव्वळ विक्री आणि नफा हा उद्देश न ठेवता आत्त्मियतेने ग्राहकांचे शंका समाधान आणि जागरूकता हा मूळ हेतू – हेच येथील प्रत्येक स्टॉलचे वैशिष्टय.
मातीची भांडी हल्ली परत फॅशन मध्ये येताहेत. अशात ह्या हवेत झटपट नफा कमाविणाऱ्यांची संख्याही थोडीथोडकी नाही. मग ते मातीची ऑरगॅनिक भांडी असल्याचं सांगून चक्क रसायने लावून साच्यात तयार झालेली आणि रासायनिक रंगाने रंगविलेली भांडी आपल्या हाती ठेवतात. मात्र, ‘ग्रामायण सेवा प्रदर्शनी’ मध्ये असली ऑरगॅनिक मातीची रसायन विरहित भांडी कशी ओळखावी ते कळते. आतून खडबडीत (rough) पृष्ठभाग असलेले भांडे चाकावर कुंभाराच्या हात्याने तयार झालेले असते. ते थोडे महाग असले तरी रसायनविरहित असल्याने आरोग्याच्या दृष्टीने हिताचे असते.
पूर्णतया गाईच्या शेणा पासून बनविलेले कार्ड बोर्ड किंवा त्याचे डिश प्लेट्स पाहून डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही.
एकीकडे फक्त नावाला वातावरण बदल (क्लायमेट चेंज), पर्यावरणहित आदींच्या गप्पा मारल्या जात असताना खरोखर त्या दिशेने प्रामाणिक प्रयत्न आणि ते करणाऱ्यांची गरज आहे. एकीकडे कृषि किंवा उद्योजकता विषयांवर होणाऱ्या प्रदर्शनांच्या नावावर हल्ली मोठ्या किंवा त्याहून मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांची उत्पादने आणि त्यांचे गोडवे गाणाऱ्या अन् त्यातून मार्केटिंग साधणाऱ्या तथाकथित एक्सपर्ट मंडळींना पाचारण करण्यात येत असते. अशा गर्दीत दरवर्षी नागपूर इथे आयोजित केली जाणारी ‘ग्रामायण सेवा प्रदर्शनी’ त्यातील खऱ्याखुऱ्या पर्यावरण पूरक तंत्रज्ञान आणि त्यावर आधारित अस्सल भारतीय उत्पादने यांच्या प्रस्तुती करिता आगळी वेगळी अन् वैशिष्टयपूर्ण ठरते.
ज्याप्रमाणे विद्यापीठात विविध विषयांवर सखोल ज्ञान मिळते, तसेच जीवन जगण्यास आवश्यक नवी दृष्टी मिळते त्याच प्रमाणे हे प्रदर्शन आहे. खुल्या विद्यापीठात कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला हवे ते ज्ञान मिळू शकते तसेच हे प्रदर्शन विविध बाबतीत आवश्यक माहिती देतं, दृष्टी देतं. इथे कुठल्या मोठ्या कंपनी किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांची उत्पादनं विकण्याचे उद्दिष्ट नसते तर स्थानिक आणि देशी तंत्रज्ञान तसेच प्रयत्नांना एक समग्र व्यासपीठ मिळवून देणारे, त्यातून स्थानीय आवश्यकता पूर्ण करणारे हे खुले विद्यापीठच झाले आहे जणू.
कोडो, रागी, बाजरी आणि अशाच खास देशी (हायब्रीड नव्हे) तृण धान्यांचा पुरवठा करणाऱ्या अस्सल सेवाव्रती संस्थांची मांदियाळी पाहायला मिळते ती ‘ग्रामायण सेवा प्रदर्शनी’ मध्येच.
तृण धान्यांचा प्रचार प्रसार वाढावा हे यंदा आंतररष्ट्रीय मिलेट वर्षानिमित्त अपेक्षीत आहेच. मग ह्यात ‘ग्रामायण प्रदर्शनी’ मागे कशी राहणार? यावेळी शालेय विद्यार्थ्यांसाठी मिलेट आहार प्रश्न मंजुषा आयोजित करण्यात आली ज्यात अकरा शाळांतील दीड हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. उत्कृष्ट विद्यार्थ्यांना बक्षिसे मिळालीत. तृणधान्य विषयी माहिती, त्यातील जीवनसत्वांची माहिती आणि त्यांद्वारे कशा नावीन्यपूर्ण पाककृती करता येतात ह्याविषयी पुढच्या पिढी मध्ये सक्रिय जागरूकता निर्माण करणे हा उद्देश ह्या उपक्रमा मागे होता.
नवनवे तंत्रज्ञान
अवघ्या तीनशे रुपयांचे सौर कंदील आपली रूम प्रकाशित करु शकते हे आपण ऐकलेले असते. पण, त्या सोलर दिव्यांची, विजेऱ्यांची संपूर्ण रेंज एकच ठिकाणी बघायला मिळणे दुरापास्त असतं. शिवाय ती भारतीय उत्पादने हवीत असा आपला आग्रह असतो. म्हणून अशा प्रदर्शनी चे महत्व आहेच आहे.
आता सौर ऊर्जेचा वापर करून कितीतरी नवनव्या उत्पादनां व्दारे आपण घरबसल्या गरम पाणी उपलब्ध करवून घेऊ शकतो तसेच आपल्या घर, कार्यालय आणि व्यावसायिक प्रतिष्ठान मध्ये हवी तितकी रोषनाई करू शकतो. एवढेच नव्हे तर रुफ टॉप वर सोलर युनिट लावून आपला विजेचा खर्च देखील कमी करवून घेऊ शकतो आणि अतिरिक्त वीज सरकारला देऊ शकतो. त्यावर सरकारी सबसिडी देखील आहे. पण, सोलर इन्स्टालेशन विश्वसनीय कंपनी कडून करवून घेण्यासाठी काय करता येईल, कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल, ते सारे देखील इथे सोप्या सरळ भाषेत समजून घेता येतं.
वैशिष्टयपूर्ण वस्तू
लाकडी ओंडके वापरून बनवलेली छोटेखानी आगगाडी पाहिली आहे काय? आपण बांबू आणि नारळाच्या झावळ्या वापरून किती तऱ्हेची शोभेची लहान लहान घरे बनवू शकतो? किंवा कलात्मक पद्धतीने नारळाच्या करवंट्या वापरून केलेल्या शोभेच्या बाहुल्या अन् एकेक नवनव्या गोष्टी पाहतच रहाव्या अशा.
ग्रामीण आणि वन्य भागातील कलाकार, कारागिरांना विशेषत्वाने बोलवून त्यांच्या कलेचे – कार्याचे वैविध्य पाहायला मिळते ते ग्रामायण सेवा प्रदर्शनीत!
मोबाईल फोन ठेवण्याचे विविध स्टँड, पेन स्टँड, राख्या, बारीक कलाकुसर असलेल्या हेयर क्लिप्स, अन्य शोभेच्या वस्तू, दैनंदिन जीवनात अत्यंत उपयोगी ठरतील अशा वस्तू पण त्या जर बांबू वर आधारित आणि नावीन्यपूर्ण असतील तर किती मजा! अशा विविध वस्तूंचं उत्पादन, विक्री आणि प्रशिक्षण या करिता मेळघाटातील ग्राम ज्ञानपीठ सुविख्यात आहे. त्यांच्या अशा सर्व उत्पादनांसह बारीक कलाकुसर असलेले बांबूची ज्वेलरी – शोभेचे दागिने.. हो, दागिने देखील इथे आपण पाहू आणि घेऊ शकतो.
आपण स्वच्छ भारत अभियान अंतर्गत रिसायकल अँड रियुज हे शब्द ऐकलेले आहेत. मात्र, प्रदर्शनात एका स्टॉल वर वापरलेल्या पी सी कॉम्प्युटर मधील की पॅड अन् विविध भाग जोडून केलेला पुतळा पाहून त्यातील शक्यता आणि सौंदर्य उमगते. वापरलेल्या कॉम्प्युटर्स, लॅपटॉप, प्रिंटर आणि जुने टीवी सुद्धा किलो च्या दराने विकले जातात आणि त्यांचा देखील विविध प्रकारे पुनर्वापर होऊ शकतो हे समर्थ पणे पटवून सांगणारे हे प्रदर्शन!
टाकाऊ वाटणाऱ्या गोष्टी कबाड से जुगाड पध्द्तीने पुन्हा उपयोगी ठरू शकतात. पूर्वीची वापरलेली वस्त्रे, अन्य कपडे आणि वस्तू पुन्हा इतरांच्या वापरात आल्या तर आपला कचऱ्याचा भार कमी तर होतोच शिवाय त्या वस्तूंची उपयोगिता वाढते, हे नकळत लहानग्यांना देखील सहज पटतं.
विविध कार्यशाळा
प्रदर्शनी दरम्यान विविध विषयांतील तज्ज्ञ मंडळींना पाचारण करून महत्त्वाच्या कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. या वर्षी ह्या कार्यशाळांचे माध्यमातून वर्तमानातील सर्वात महत्त्वाच्या विषयांवर उदाहरणार्थ पाण्याचं नियोजन आणि त्याचे महत्त्व, उत्पन्न वाढीसाठी सेंद्रिय शेती आणि त्यातून होणारे खरे दीर्घकालीन लाभ, परस्पर पूरक जंगल आणि कृषी तसेच त्यांचे संवर्धन अन् संरक्षण अशा विविध विषयांवर अत्यंत महत्त्वाची माहिती देणारी चर्चा अनुभवता आली.
एमएसएमई अन् उद्योजकतेवर कार्यशाळा
ग्रामायण सेवा प्रदर्शनात एमएसएमई-विकास आणि सुविधा कार्यालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने एक उद्योजक कारागीर कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेतून छोट्या व नविन उद्योजकांना त्यांच्या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली माहिती देत अनेक टिप्स देण्यात आल्या.
कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून युनिव्हर्स एक्स्पोर्टचे श्री. प्रवीण वानखेडे, एमएसएमईचे सहायक संचालक राहुल मिश्रा आणि श्रीकांत नागमोते यांचे उद्योग आणि उद्योजकता ह्या विषयाशी निगडीत अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन लाभले.
या कार्यशाळेत एमएसएमई तज्ञांसोबत प्रदर्शनकर्ता, ग्रामायण सेवा प्रदर्शनात सहभागी झालेल्या प्रदर्शक तसेच छोट्या व नविन उद्योजकांना संधी प्रदान करण्याच्या उद्देशाने, लोकांना व्यवसाय सुरु करुन त्याचे योग्य संचालन व यशस्वी वाटचाल करण्यास उपयोगी अशा
विविध विषयांवर उदाहरणार्थ एमएसएमईसाठी सरकारी योजना आणि उपक्रम, एमएसएमईची क्षमता वाढवणे, निर्यात दस्तऐवजीकरण आणि कृषी उत्पादनांच्या निर्यातीसाठी प्रक्रिया, बँक कर्ज आणि प्रक्रिया, या आणि अशा निगडित विविध विषयांवर चर्चा झाली. उत्पादनांच्या पॅकेजिंगवर सुद्धा तज्ञांचे सत्र पार पडले.
यावेळी प्रवीण वानखेडे यांनी सध्याच्या बाजारपेठेतील वातावरण आणि त्यातून यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, निर्यात करण्यासाठी कोणत्याही विशेष कौशल्याची आवश्यकता नाही. कोणतीही वस्तू निर्यात केली जाऊ शकते. मात्र, त्यासाठी योग्य नियोजन आणि काळजीपूर्वक प्रक्रिया आवश्यक आहे. श्री वानखेडे यांनी स्वतःच्या जीवनाचा प्रवास अगदी एका भूमिपुत्रापासून तर एक्सपोर्टरपर्यंतची मजल उलगडून सांगितले.
एमएसएमईचे सहायक संचालक राहुल मिश्रा यांनी विविध सरकारी योजनांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, एमएसएमई लहान उद्योजकांना विविध प्रकारे मदत करते. प्रोडक्टचे ब्रँडिंग, ट्रेडमार्क, बारकोडिंग आणि पॅकेजिंग डेव्हलोप करण्यासाठी एमएसएमई मदत करते. तसेच, लहान उद्योजकांसाठी रिटेल आउटलेट उघडण्यासाठी देखीलएमएसएमई मदत करते.
श्रीकांत नागमोते यांनी प्रोडक्टच्या पॅकिंग खास करुन इको फ्रेंडली पैकेजिंग चे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी सांगितले की, आजच्या ग्राहकांना आकर्षक आणि पर्यावरणास अनुकूल पॅकेजिंगची मागणी आहे. त्यानुसार पॅकेजिंग केल्यास ग्राहकांचे लक्ष वेधून घेणे सोपे जाते.
गीत रामायण
प्रसिद्ध गायक श्री सुधीर फडके यांचे शिष्य आणि संस्कार भारती चे कार्यकर्ते नामदेव बालपांडे ह्यांच्या सुमधुर स्वरात गीत रामायणाचा कार्यक्रम हा देखील एक आगळा अनुभव ठरला. मूळचे तारसा (रामटेक, जिल्हा नागपूर) येथील श्री बालपांडे पूर्व विदर्भातील पारंपरिक मंडई कार्यक्रमा दरम्यान गावोगावी जाऊन गीत रामायणातील महत्त्वाच्या प्रसंगांची गाणी सादर करतात. प्रेक्षकांना त्यांच्या स्वरात गीत रामायण अनुभवायला मिळणे अशी प्रस्तुती ही ग्रामायण च्या आयोजकांची कल्पकता म्हणावी लागेल.
‘ग्रामायण’ ने आता विदर्भाबाहेर पाऊल टाकावे आणि देशभर अशी आयोजने करून पेरते व्हावे, सर्वांना अंतर्मुख अन जाणते करावे !
(भाषांतर: इंडिया इनपुट ब्यूरो)