India2UK पंढरपूर ते लंडन वारी: 22 देश, 70 दिवस, 18000 किमी!
वारीचे दिव्य क्षण अनिल खेडेकरांच्या शब्दांत! युनायटेड किंगडममध्ये प्रथमच भव्य ऐतिहासिक आषाढी एकादशी सोहळ्याचे आयोजन, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर UK


India2UK पंढरपूर ते लंडन पादुका दिव्य यात्रा.. अर्थात, पहिली आंतरराष्ट्रीय वारी! हि आजवरच्या मानव इतिहासातील सर्वात प्रदीर्घ आणि सर्वात पहिली आंतरराष्ट्रीय वारी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर UK यांच्या तत्वावधानाने आणि श्री अनिल खेडकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. 70 दिवसांचा 22 देशांमधून रस्त्याने अंदाजे 18,000 किमी प्रवास, प्रत्येक देशात स्थानिक वारकरी व विठ्ठल भक्तांकडून आत्मीय स्वागत..भक्तिरसात न्हालेली ऐतिहासिक वारी; ते दिव्य क्षण अनिल खेडेकर यांच्या शब्दांत..
India2UK पंढरपूर ते लंडन ग्लोबल वारी – एक अद्वितीय अनुभव व ऐतिहासिक क्षण..
वारी म्हणजे फक्त चालण्याचा प्रवास नाही, ती आहे आत्म्याची यात्रा – श्रद्धेची, भक्तीची, आणि विठ्ठलाशी जोडणाऱ्या नात्याची. यावर्षी मी एक अद्भुत आणि संस्मरणीय वारी अनुभवली – पंढरपूर ते लंडन ही माझी विठुरायाला अर्पण केलेली अनोखी वारी. 2 खंड, 22 देश, 70 दिवस, 18 हजार किमी चा ग्लोबल वारीचा इतिहास.

पंढरपूरातून सुरुवात करताना मन भरून आलं होतं. चरणी वाकून विठोबाचं दर्शन घेतलं आणि मनाशी एक संकल्प केला – ही वारी फक्त माझ्यासाठी नाही, ती आहे जगभरातील भक्तांसाठी. भारतातील गावागावातून, शहरांमधून, डोंगर-दऱ्या पार करत करत, मध्यपूर्वेचे रस्ते, युरोपातील सुंदर खेडी, आणि शेवटी इंग्लंडमध्ये प्रवेश… प्रत्येक वळणावर वेगळी संस्कृती, वेगळी भाषा, पण मनात फक्त एकच नाव – पांडुरंग.

प्रत्येक ठिकाणी विठ्ठलभक्त भेटले, कुणी ओळखीचे तर कुणी अनोळखी, पण सर्वांची भक्ती समान. कुठे अभंग गायले गेले, कुठे टाळ-चिपळ्या वाजल्या, तर कुठे फक्त डोळ्यांतून वहाणाऱ्या अश्रूंनी भाव प्रकट केला. हे कुठलं वलय होतं – जे रस्त्यांतून, लोकांतून आणि माझ्या मनातून उमटत होतं.
..आणि जेव्हा लंडनमध्ये पोहोचलो, तेव्हा थेट एका मंदिरात जाऊन विठोबाचं नामस्मरण केलं. शेकडो लोक तिथे जमा झाले होते – इंग्लंडमधल्या या दूरदेशी भूमीतही *“जय जय राम कृष्ण हरी”*चा गजर झाला आणि मन पुन्हा एकदा त्या वाळवंटावर पोहोचलं…
ही वारी एक आठवण नाही, ती एक शिकवण आहे. शरीराने लांब गेलो असलो, तरी मनाने विठ्ठल जवळच होता – प्रत्येक पावलागणिक अधिकाधिक जवळ येणारा.
आपण सर्वांना आषाढी एकादशीनिमित्त हार्दिक शुभेच्छा! विठ्ठल नामाचा गजर तुमच्या आयुष्यात सातत्याने घुमत राहो,भक्तीचा मार्ग सदैव प्रकाशमान राहो, आणि विठोबाच्या चरणी तुमचं जीवन मंगलमय होवो.
जय हरि विठ्ठल! जय पांडुरंग!
India2UK पाऊले चालती लंडनची वाट..
पंढरपूरहून एप्रिल महिन्यात लंडनच्या दिशेने निघाल्या त्या महाराष्ट्राचे आद्य-दैवत श्री विठ्ठल माउलीच्या पादुका अखेर लंडनला पोहोचल्या! आळंदी, देहू, संभाजीनगर, नागपूर मार्गे वाराणसी, काठमांडू, नेपाळ, चीन, किर्गिस्तान, उज्बेकिस्तान, कजाकिस्तान, रशिया, लाटव्हिया, लिथुआनिया, रोमानिया, जॉर्जिया, बेल्जियम, फ्रान्स, ब्रिटन आदी 22 देशांतून भाविक वारकरी भक्तांसह लंडनमध्ये 21 जून 2025 ला पोहोचल्या. ब्रिटनमधील महाराष्ट्र मंडळाने पादुकांचे स्वागत केले, या विशेष उपक्रमाचे स्वागत आळंदीचे माजीविश्वस्त डॉ. सुरेश गरसोळे यांनी नकाशाद्दारे केले. या उपक्रमात वारकरी सर्वश्री अनिल खेडेकर, संतोष पारकर, विनोद देवकर, डॉ. शिवानंद जाधव आदींनी सहभाग घेतला होता.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर UK: ऐतिहासिक आषाढी एकादशी सोहळा.. United Kingdom मध्ये प्रथमच आयोजन!
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर UK यांच्या वतीने युनायटेड किंगडममध्ये प्रथमच भव्य आषाढी एकादशी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा एक ऐतिहासिक व पावन क्षण असून UK मधील सर्व विठ्ठलभक्तांसाठी भक्ती, एकात्मता आणि आनंदाचा संगम ठरणार आहे. यावेळी सर्व भाषा, जाती, पंथाचे, भारतीय एकत्र येतील.
📍 स्थळ: Langley College, Slough – Langley Campus
पत्ता: Station Road, Slough, SL3 8BY
🕙 वेळ: सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत.
तारीख: 6 जुलै 2025 (रविवार)
येथील आकर्षणं: पारंपरिक दिंडी सोहळा, अभंग भजन व कीर्तन, तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम
पुढील उद्दिष्ट:
हा सोहळा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून, एक दीर्घकालीन आध्यात्मिक ध्येय आहे – म्हणजेच UK मध्ये भव्य विठ्ठल-रुक्मिणी मंदिर उभारणे, जे प्रवासात असलेल्या वारकरी परंपरेचे एक शाश्वत केंद्र बनेल.
📞 संपर्कासाठी:
📧 ईमेल: temple@vitthalrukmini.org.uk
☎ लँडलाइन: +44 20 3925 0925
📱 मोबाइल / WhatsApp: +44 7768 679194
🌐 संकेतस्थळ: http://www.vitthalrukmini.org.uk
More on http://www.indiainput.com