मराठी
Left handers डावखुऱ्या व्यक्तींचे विश्व: भेदभाव, ऊंच यश!
Left handers म्हणजे डावखुऱ्या व्यक्तींचा देखील एक आंतरराष्ट्रीय दिवस आहे. १३ ऑगस्ट म्हणजे डावखुऱ्या व्यक्तींना समर्पित दिवस. इंटरनॅशनल लेफ्ट हँडर्स डे. ह्या निमित्ताने संशोधक आणि लेखक विजय लिमये विचारताहेत, ‘डावा की उजवा?’
मनुष्य स्वभाव-धर्माप्रमाणे जे अल्पसंख्य असतात त्यांच्यावर अनेक विनोद केले जातात तसेच ते चेष्टेचा विषय सुद्धा असतात. तसे पाहायला गेले तर डावा आणि उजवा हात यांच्यात मतभेद करण्यासारख काहीच नाही, संख्येने ते दोन्हीही समसमान आहेत, तरीही केवळ काहीच लोक डाव्या हाताने काम करतात म्हणजे ते अल्पसंख्य आहेत हे समजल्यावर त्यांच्यातही डावे उजवे करून दूरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
गेल्या काही वर्षात जगात एक नवीन प्रघात सुरू झालेला आहे, असे जे सोशीत अल्पसंख्य असतात त्यांच्या नावाने एखादा दिवस ठरवला जातो. 13 ऑगस्ट हा दिवस डावखुऱ्या लोकांसाठी समर्पित केला गेला आहे.
आता ही नावे वाचा आणि सांगा ह्या सर्व लोकांतील साम्य काय असावे?
मोहनदास गांधी, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, नरेंद्र मोदी, सुरेश रैना, सौरभ गांगुली, युवराज सिंग, झहीर खान, अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, मार्क झुकरबर्ग, रतन टाटा, रजनीकांत, बराक ओबामा, बिल गेट्स, अंजलीना जोली, प्रिन्स विलियम, चार्ली चॅपलीन, आईनस्टाईन.
ह्यांच्यात एक साम्य म्हणजे ही सारी मंडळी आपापल्या क्षेत्रातील अगदी कमालीचे यश संपादन केलेली आहेत. पण, आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही काही जग प्रसिद्ध डावखुरे लोकांची नावे आहेत!
जाणीव – डावखुरे असण्याची आणि भेदभावाची!
लहानपणी डाव्या हाताने काम करताना पाहिले की घरातील ज्येष्ठ रागावून वेळप्रसंगी चापटी मारून उजव्या हाताने काम करायला लावत असत. आई तर मुलांचे हात बांधून ठेवत, मगच त्याला/तिला जेवायला मिळे. डावखुऱ्या लोकांना जर विचारले, तुम्हाला पहिला मार कधी खाल्लेला आठवतोय? सर्वांचे उत्तर एकच राहिल! डाव्या हाताने जेवताना खाल्लेला मार चांगलाच आठवतो. बालक डावखूरे असणे ही सुद्धा अनुवांशिकता आहे हे आता समजू लागले आहे.
मी जरी उजवा असलो तरी माझ्या भावंडात काही जण डावखुरे होतेच आणि त्यांचे आमच्या सारख्या उजव्याना, विशेष कौतुक असे. जवळपास सर्वच लोक उजव्या हाताचे असतात म्हणजे काहीच डावखुरे असल्याने आम्हाला ते वेगळे व विशेष वाटत असत. सहज सांगायचं म्हटलं तरी डाव्या हाताने जेवणे, डाव्या हाताने लिहिणे, भांडणात त्यांचा डावा हात नेहमीच अग्रेसर असतो, तसेच एखादी वस्तू पकडताना डावा हात सहज पुढे येतो हे पाहून त्यांच्याबद्दल गम्मत वाटे. आता यामुळे काहीवेळा एखाद्या धार्मिक प्रसंगी त्याची अवस्था अडचणीची होई!, जसे की प्रसाद घेताना त्यांचा डावा हात सहज समोर येई आणि त्यांच्यावर प्रसाद देणारा डोळे वटारी. त्यांच्या लगेच लक्षात येई आणि मग हळूच उजवा हात पुढे केल्यावरच प्रसाद मिळे. घरचा ज्येष्ठ व्यक्ती प्रसाद वाटत असल्यास, कधीकधी खाण्याच्या प्रसादा सोबत पाठीत धम्मक लाडू व गालावर चापट पोळीचा प्रसादही फुकटात मिळत असे.
आता डावा की उजवा ही निसर्गाने दिलेली देणगी आहे हे काही आमच्या पालकांना कधी लक्षातच आले नाही. नाही म्हणायला, कधी कधी आम्ही उजवे या डाव्यांवर राग काढायला, मुद्दाम त्यांची चुगली करून त्यांना कसा प्रसाद मिळतो हे मिटक्या मारत पहात असू. थोडक्यात ही देणगी आम्हाला डाव्यांवर सूड उगवण्यासाठी कामी येई.
डाव्या आणि उजव्याना उगीच राजकारणात घालून लोकांच्यात संभ्रम करण्याचा प्रयत्न कोणत्या महाभागांनी केला आहे याचा शोध लावावा लागेल. साम्यवादी लोकांना उगीचच डावे म्हणून संबोधण्यात कोणता शहाणपणा आहे माहीत नाही. ते ही बिचारे अल्पसंख्य असल्याने निमूटपणे ऐकुन घेतात.
Left Handers डाव्यांची बाजू उजवी!
मैदानी खेळात मात्र नेहमीच डाव्यांची खूप चलती दिसून आलेली आहे. त्यांच्याशी खेळताना समोरचा नेहमीच संभ्रमात पडतो, उदाहरणार्थ क्रिकेटमध्ये डावखुऱ्या बॅट्समनला बॉल टाकताना बॉलरला क्षणभर का होईना विचार करावाच लागतो, तसेच इतर खेळांचे आहे त्यामुळे हे डावखुरे खेळाडू अनप्रेडिक्टेबल असतात असा काहीसा समज आहे.
आज-कालचे पालक डावखुऱ्या मुलांना आमच्या लहानपणी मिळत होता तसा त्रास देत नाहीत. मुलांना मिळालेली ही देणगी आहे, त्यांना उजव्या आणि डाव्या हाताने सहज काम करता येते, थोडक्यात उभयपक्षी इंग्रजीमध्ये त्याला ambidextrous म्हणतात, करण्यावर भर दिला जातो आणि हे कौशल्य मिळाल्यावर अशी मुले दोन्ही हातांनी सर्वच प्रकारची कामे उत्तम रित्या करू लागतात. फक्त धार्मिक विधी मध्ये मात्र मुलांना थोडी विशेष काळजी घेऊन कृती करावी लागते कारण इथे अनावधानाने सुद्धा डावा हात सात्विक, धार्मिक काम करण्यासाठी पुढे करता येत नाही.
सैन्यात प्रत्येकाला उजव्या हाताने सल्यूट करणे हा कायदा आहे. इथे तुम्ही डावे असला तरीही उजव्या हाताने सल्यूट करण्याची परंपरा आहे. उजवा हात सल्यूट करण्याच्या योग्यतेचा नसला तरच डाव्या हाताचा वापर करावा असा नियम आहे.
दुचाकी व चारचाकी गाड्या सुद्धा नेहमीच उजवा हाताचा वापर जास्त कसा होईल या उद्देशानेच बनवल्या गेल्या आहेत आणि यात उजव्या हातावर जास्त जबाबदारी टाकली जाते. उदाहरणार्थ फोरविलर गाडीत स्टेरिंग सांभाळणे, इंडिकेटर वापरणे ही मोठी जबाबदारी उजवा हात करतो आणि डाव्या हाताला थोडेसे हलके काम म्हणजे फक्त गियर बदलण्याचे काम दिले जाते. काही जण उगीच माझ्या लेखात खोट काढण्यासाठी, मग अमेरिकेत तर उजव्या हातात गियर असतो म्हणत शेखी मिरवण्याचा प्रयत्न करतील.
माणसाने सगळीकडे भेदभाव केलेला आहे तसा तो दररोजच्या कामकाजामध्ये सुद्धा केलेला दिसतो. सर्वसाधारणपणे कनिष्ठ दर्जाची कामे ही डाव्या हाताने केली जातात, जसे की प्रातर्विधी आटोपल्यावर सफाई करणे वगैरे. डावखुरे लोक तिथे कोणता हाथ वापरतात, हे त्यांच्याकडून समजून घ्यावं लागेल असो. उजव्या हाताला मात्र मानाची कामे मिळतात जसे की गंध लावणे, अगरबत्ती अथवा दिवा लावणे, आरती करताना शक्यतो उजव्या हातातच थाळी व दिवा पकडतात, तसेच प्रसाद देताना उजवा हातच वापरणे अशा काही गोष्टी आहेत की जिथे भेदाभेद प्रकर्षाने जाणवते. आशीर्वाद देण्यासाठीही उजवाच हात पुढे करावा ही प्रथा आहे, तसेच नमस्कार करताना उजव्या हाताने पायाला स्पर्श करावा असा प्रघात आहे.
एकंदरीतच डावखुरे अल्पसंख्य असल्यामुळे बहुसंख्यांच्या समोर थोडीशी कुचंबणा होतेच आणि त्यातून गैरसमज सुद्धा होतात. डावखुरी सून तर सासूच्या डोळ्यात खुपतेच. सुनांना उठता, बसता बोल ऐकावे लागतात. अमकीचा नवरा, तमक्याची बायको दिसण्यात जरा डावी आहे म्हणत, भेदभावाची दरी वाढवली जाते.
माझा ठाम विश्वास आहे, जो कोणी पहिला लेखक आहे, ज्यांनी लेखणी हातात घेतली, आणि त्याच्या पासून लिखित भाषेचा उगम झाला, ती व्यक्ती नक्की डावखुरी असावी, म्हणूनच त्याने लिखाणाची सुरुवात डावीकडून केली आहे. तसेच बोली भाषेतही डावे उजवे म्हणत डाव्यांनाच अग्रक्रम दिला आहे, अश्या या डाव्या उजव्यांच्या शब्दछलात प्रथेनुसार मी लेखाची सुरवात डावीकडून केली आहे.
विजय लिमये
(Images from Twitter, Wikipedia)
Dear valued Readers and Supporters, at IndiaInput.com, YOU are the heart of everything we do! Your unwavering support has fueled our passion for delivering top-notch news and insights on a wide array of topics. We deeply appreciate the time you spend with us, making our journey so meaningful. Your favorite online news magazine Indiainput.com celebrates YOU and the association with you. We’re incredibly grateful for your selection and in joining us on this remarkable adventure. Together, let’s continue to create a brighter, exciting & knowledge-filled journey to a more rewarding future!
Visit some of our important Internal Links
Administration related news & inputs:
Spotlight related news & inputs:
Startup related news & inputs:
Innovation related news & inputs:
Specials in our news & inputs:
Infrastructure related news & inputs:
Industry related news & inputs:
Trends in news & inputs: