मराठी
PASSENGER SAFETY प्रवासी सुरक्षेसाठी विभागांची झाडाझडती!
संदीप जोशींनी नागपूर वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाला कामावर लावले.


खाजगी ट्रॅव्हल्स कडून नियमांची पायमल्ली होऊ नये याकरिता उपमुख्यमंत्री कार्यालयाद्वारे पत्र नागपूर वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाला निर्गमित करण्यात आले आहे. नागपूर शहरातील खाजगी बसेसची नियमित तपासणी संदर्भात करण्यात येत असलेल्या कारवाईचा तपशील दहा दिवसांत सादर करावा लागणार.
(इंडिया इनपुट टीम)
ना. देवेंद्र फडणवीस ह्यांच्या नागपुरातील उपमुख्यमंत्री कार्यालयाने एक समर्थनीय पाऊल उचलले आहे. श्री फडणवीस ह्यांचे निर्देशानुसार हे पाऊल उचलण्यात आल्याचे समजते.
उपमुख्यमंत्री यांचे मानद सचिव आणि नागपूरचे पूर्व महापौर श्री संदीप दिवाकर जोशी ह्यांनी एक पत्र पाठवून नागपूर वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाला चक्क एका आवश्यक कामावर लावले आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही.
Passenger Safety : कारवाईचा तपशील मागितला !
ह्या पत्रात श्री जोशी ह्यांनी दोन्ही विभागांना सांगितले आहे, की नागपूर शहरातील खाजगी बसेसची नियमित तपासणी संदर्भात करण्यात येत असलेल्या कारवाईचा तपशील दहा दिवसांत सादर करावा. हे पत्र पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग, पोलीस उपायुक्त झोन क्रमांक 3 आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी ह्यांना पाठविण्यात आले आहे.
दिनांक ३० जून आणि १ जुलै च्या दरम्यान मध्यरात्री नंतर समृध्दी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यात भीषण अपघात झाला. नागपुरातील एक खाजगी ट्रॅव्हल्स कंपनी विदर्भ ट्रॅव्हल्स च्या नागपूर ते पुणे प्रवासावर निघालेल्या बसला अपघातात आग लागली आणि २६ जण हकनाक प्राणास मुकले. ह्या दुर्दैवी प्रकारा नंतर खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्या, ते स्वीकारत असलेली कार्य प्रणाली आणि संबंधित वाहतूक पोलिस तसेच परिवहन विभागाची कार्यपद्धती वर कित्येक प्रश्नचिन्ह लागले आहेत. मुळात खाजगी ट्रॅव्हल्स च्या कारभारात उघडपणे कितीतरी त्रुटी स्पष्टपणे दिसत असून त्यांचेवर चाप लावण्यासाठी जबाबदार असलेल्या एजन्सीज नेमके काय करताहेत ह्याचा देखील तातडीने शोध घेण्याची गरज निर्माण झालेली आहे. ह्या अनुषंगाने जनतेच्या मनातील मुद्दे मांडणारे हे पत्र एक महत्त्वाचे पाऊल ठरु शकते.
सदर पत्रात श्री जोशी ह्यांनी खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेस मध्ये सुरक्षा मानकांविषयी विचारणा केली आहे. विशेषतः वातानुकूलित स्लीपर बसेस चे सध्या आलेले पेव आणि त्यांची आक्रमक कार्यशैली पाहता प्रवाशांच्या सुरक्षे करिता हा महत्वाचा प्रश्न आहे. बस मध्ये अधिकाधिक सीट्स बसाव्यात याकरिता बसच्या प्लॅन मध्ये अनधिकृत रित्या बदल करण्यात येतात त्याला मंजुरी मिळते कशी अशा सारखे प्रश्न ह्यामुळे चर्चेत आले आहेत. बसेस मध्ये सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक मानके आणि निगडित बाबींची पूर्तता करण्यात येते अथवा नाही, त्यांचे उल्लंघन करण्यात येते किंवा कसे आणि ह्या बाबींची तपासणी संबंधित विभागाकडून नियमितपणे, नीट तसेच जागरूकपणे होते किंवा नाही हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित झाला आहे. गेल्या वर्षभरात फिटनेस सर्टिफिकेट, पी यू सी आदींची किती तपासणी आणि चौकशी करण्यात आली त्याचा तपशीलवार अहवाल देखील मागविण्यात आल्याचे सांगितले जाते.
आपत्कालीन परिस्थितीत बस मधून बाहेर पडण्याचे मार्ग, अशा आपत्कालीन द्वारांची संख्या, काच फोडून बाहेर पडण्याकरिता हॅमरस् आणि अग्निशमन यंत्र किंवा व्यवस्था आदिंविषयी माहिती मागविण्यात आल्याने खाजगी ट्रॅव्हल्स कडून होणाऱ्या गैरप्रकारांना तसेच नियमांचे उल्लंघन करण्याच्या प्रकाराला आता काही प्रमाणात तरी आळा बसेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

समृध्दी महामार्गावर ताशी कमाल वेग मर्यादा १२० किमी असून खाजगी ट्रॅव्हल्स च्या बसेस अशा वेगात धावण्याच्या स्थितीत आहेत काय, त्यांच्या टायर्स ची स्थिती याकरिता कितपत योग्य आहे, टायर्स मध्ये नायट्रोजन गॅस च वापर होतो काय असे मुद्दे सुद्धा उपस्थित करण्यात आले असून ह्या बाबींची सुद्धा नियमित तपासणी करण्यात येते काय अशी पत्रात विचारणा करण्यात आली असल्याचे कळते. लांब पल्ल्याच्या प्रवासात वाहन गतीने धावत असेल तरी नायट्रोजन वायू मुळे टायर अंतर्गत तापमान सहसा वाढत नाही आणि टायर मधील दाब अर्थात प्रेशर त्वरित गतीने वाढत नाही. त्यामुळे, बस मधील टायर्स मध्ये नायट्रोजन वायू चा वापर सहसा अपेक्षित आहे, हे येथे उल्लेखनीय.
ह्या पत्रामुळे आणखी एक मोठा मुद्दा ऐरणीवर आला आहे. प्रवासी वाहतुकीचा परवाना असताना खाजगी ट्रॅव्हल्स च्या बसेस द्वारे मोठ्या प्रमाणावर होणारी माल वाहतूक आणि केली जाणारी गोदामांची व्यवस्था ह्याकडे वर्तमान राज्य सरकारचे लक्ष आहे, हे आता स्पष्ट झाले असून नियमांच्या पायमल्ली ला चाप बसणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
(images: pexels.com)