#Rural Development : ग्रामायण उद्यम एक्सपो 26 ते 30 डिसें.!
उद्योजक होण्याची स्फूर्ती, दिशा आणि ऊर्जा देणाऱ्या 'ग्रामायण' ची 7वी आवृत्ती..चालू वर्षाअखेर!
#Rural Development चे जणू खुले विद्यापीठच!
हो, ‘ग्रामायण’..
26 ते 30 डिसेंबरला नागपुरात!!
कुसुमताई वानखेडे सभागृह, उत्तर अंबाझरी मार्ग, धरमपेठ, नागपूर येथे..
यावर्षी ग्रामायण सोबत को-पार्टनर.. व्हीआयए ॲग्रो रूरल डेव्हलपमेंट अँड फूड प्रोसेसिंग फोरम!
#Rural Development चे जणू खुले विद्यापीठच अशी ‘ग्रामायण’ ची ओळख आहे. आपणास उद्यमशील होण्यास स्फूर्ती देणारे, त्यासाठी वेगवेगळ्या पावलांवर आणि वळणांवर हात धरून मार्गदर्शन करणारे असे ग्राम विकासाचे एकमेव समृद्ध, खुले आणि निःशुल्क व्यासपीठ अशी अवघीय सहा आवृत्तींत ओळख बनविण्यात हे एक्स्पो यशस्वी ठरलेय ! ..आणि विदर्भातील छोटे उत्पादक, लघुउद्योजक, कुटीरउद्योग, ग्रामीण कारागीर, शिल्पकार व स्वयंसेवी संस्था (एनजीओ) यांना समाजासमोर आणून नागपूरची बाजारपेठ उपलब्ध करून देणारे Expo म्हणून ‘ग्रामायण’ चा लौकिक सर्वदूर पसरलाय ! आता 7वे ग्रामायण उद्यम एक्सपो 26 ते 30 डिसेंबरदरम्यान आयोजित करण्यात आले आहे.

यंदाच्या प्रदर्शनामध्ये प्रत्यक्ष उत्पादन करणाऱ्या उद्योजकांवर विशेष भर देण्यात आला असून, B2B आणि B2C या दोन्ही स्वरूपांचा समन्वय असणार आहे. त्यामुळे उद्योजकांना नवीन विक्रेते, विक्रेत्यांना नवीन उत्पादने आणि ग्राहकांना थेट खरेदीची संधी मिळणार आहे.
सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत सुरू असणारे हे पाच दिवसांचे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुले असून, कुसुमताई वानखेडे सभागृह, उत्तर अंबाझरी मार्ग, धरमपेठ, नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती ग्रामायण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल सांबरे, प्रदर्शनी आयोजक प्रशांत बुजोने तसेच व्हीआयए ॲग्रो रूरल डेव्हलपमेंट अँड फूड प्रोसेसिंग फोरमच्या वतीने डॉ. कीर्ती सिरोठिया यांनी उद्योग भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
ग्रामायण प्रतिष्ठानतर्फे एनजीओंच्या सामाजिक कार्याला व्यासपीठ देण्यासाठी अभ्युदय सेवा प्रदर्शन आयोजित केले जाते. अशी दोन प्रदर्शने यापूर्वी यशस्वीपणे पार पडली आहेत.

यावर्षी नागपूरसह अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, जालना आदी ठिकाणांहून उद्योजक सहभागी होत आहेत. एकूण 82 स्टॉल्स आणि काही टेबल स्पेस मिळून सुमारे 100 उद्योजकांचा सहभाग असणार आहे. या प्रदर्शनाच्या आयोजनात विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन (VIA) चे ॲग्रो रूरल डेव्हलपमेंट अँड फूड प्रोसेसिंग फोरम आणि सॅटर्डे क्लब यांचा सहभाग आहे.
प्रदर्शनात विविध श्रेणीतील उद्योजकांचा सत्कार, मोठ्या उद्योजकांच्या प्रकट मुलाखती, तरुणांच्या बिझनेस आयडियांचे सादरीकरण, कार्यशाळा, तज्ज्ञ मार्गदर्शन तसेच उत्पादक-विक्रेता संवाद असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
लघुउद्योजक, उत्पादक, प्रक्रिया उद्योग, उद्योगाशी संबंधित शासकीय संस्था व संघटना, कारागीर तसेच स्थानिक उत्पादने तयार करणाऱ्या संस्था व एनजीओंना बळ देणारे हे प्रदर्शन स्वावलंबन, उद्योजकता आणि शाश्वत उपजीविकेच्या निर्मितीसाठी तसेच रोजगारनिर्मितीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला आकार देणारे हे व्यासपीठ आहे.
या वर्षी केवळ उत्पादक, उद्योजक, स्टार्टअप्स आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या संस्था—जसे की बँका, शासकीय विभाग आणि कौशल्य-विकास संस्था—यांचा सहभाग राहणार आहे. त्यामुळे ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाशी सुसंगत, स्थानिक पातळीवर निर्मित अस्सल उत्पादने अभ्यागतांना पाहता येतील.

प्रदर्शनात विविध विषयांवरील उत्पादने, थेट B2B आणि B2C संधी, वित्तीय संस्थांशी संवाद, व्यवसाय नेटवर्किंग तसेच नवीन उत्पादने लाँच करणे, थेट प्रात्यक्षिके सादर करणे आणि ग्राहकांचा अभिप्राय मिळविण्याच्या संधी उपलब्ध असतील.
पर्यटकांसाठी वाजवी किमतीत अद्वितीय हस्तनिर्मित वस्तू, सेंद्रिय व ग्रामीण उत्पादने, थेट प्रात्यक्षिके आणि परस्परसंवादी काउंटर ही विशेष आकर्षणे असतील. स्थानिक उद्योजकांना पाठिंबा देण्याची ही एक उत्तम संधी असून, या प्रदर्शनाचा प्रचार डिजिटल व ऑफलाइन माध्यमांतून मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे.
विविध कार्यक्रम व उद्योजकांचा सत्कार:
प्रदर्शनाचे उद्घाटन 26 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे. पहिल्या पिढीतील उद्योजक, महिला उद्योजक, तिसऱ्या पिढीतील उद्योजक, पती-पत्नी मिळून चालवत असलेले उद्योग आणि स्टार्टअप्स अशा पाच श्रेणींतील उद्योजकांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरुण व विद्यार्थ्यांच्या बिझनेस आयडिया समोर आणण्यासाठी आयडियाथॉन आयोजित करण्यात आले असून, 27 डिसेंबरला निवडक आयडियांचे सादरीकरण होईल. मुलांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी घेतलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण 30 डिसेंबरला होणार आहे.
30 डिसेंबर रोजी सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप समारंभ होईल.

विशेष आकर्षण: विविध उपक्रम, मुलाखती आणि कार्यशाळांचे आयोजन
29 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत व्हीआयए ॲग्रो रूरल डेव्हलपमेंट अँड फूड प्रोसेसिंग फोरमच्या वतीने उद्योग क्षेत्रातील विविध उपक्रम, मुलाखती आणि कार्यशाळांचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. मोठ्या अन्नप्रक्रिया उद्योगांना पूरक (Ancillary) उद्योग उभारणीवर भर देण्यात येणार असून, डिहायड्रेशन, प्राथमिक प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि पॅकेजिंग या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाईल तसेच मायक्रोग्रीन्स लागवडीवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन असलेली कार्यशाळा आयोजित केली जाईल.
आपल्या उद्योगाला नव्या उंचीवर नेण्यासाठी ग्रामायण उद्यम एक्सपो 2025 मध्ये सहभागी व्हा. उद्योजक, शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देत त्यांना ग्लोबल स्तरावर नेण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन ग्रामायण प्रतिष्ठान, व्हीआयए रूरल फोरम आणि सॅटर्डे क्लब यांनी केले आहे.



