मराठी

Samruddhi Mahamarg रस्ता तयार आहे, पण वाहन चालक तयार आहेत?

चालकांचे प्रबोधन आणि वाहनांची तपासणी हवीच! 'इंडिया इनपुट' च्या रिपोर्ट वर वाचकांचा प्रतिसाद!

Samruddhi Mahamarg
Recent accident site on the Express highway.

Samruddhi Mahamarg वर घडणारे अपघात आणि त्यामागील कारणे ह्या विषयावर इंडिया इनपुट टीम ने माहे मे -जून २०२३ ह्या कालावधीत सघन पाहणी-अध्ययन सर्वे केला.

त्या आधी नागपूरच्या विश्वेश्वरैय्या नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी ने सुद्धा एक अध्ययन सर्वे केला होता.

दोघांच्या पाहणी अहवालातील निष्कर्षांवर इंडिया इनपुट ने रिपोर्ट प्रकाशित केला.

त्यावर वाचकांच्या प्रतिक्रियांचा हा आढावा. 

(इंडिया इनपुट टीम)

समृद्धी महामार्ग म्हणजे नागपूरला मुंबईशी जोडणारा आणि अवघ्या काही तासांत वाटेतील कुठल्याही जिल्ह्यात नेऊ शकणारा गतिशील चमत्कारच! मात्र, ह्या आधुनिक युगाच्या चमत्काराला कुणाची दृष्ट लागली किंवा सध्या अपघातांचे ग्रहण लागले आहे कि काय असे वाटू लागले आहे. १ जुलै २०२३ रोजी समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यात एका खाजगी बसला अपघात होऊन त्यात किमान २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सर्वत्र शोक पसरला, हळहळ व्यक्त होऊ लागली. मात्र कुठल्याही गोष्टीत राजकारण करणाऱ्यांनी ह्या दुर्दैवी घटनेचे सुद्धा भांडवल करण्याचा प्रयत्न केला. जणू काही नव्या शतकाचा आधुनिक आणि वेगवान एक्सप्रेस हाय वे उभारणे हीच मोठी चूक झाली. ‘असली समृद्धी काय कामाची?’ किंवा ‘अशी समृद्धी नको’ अशा वाक्यांनी समृद्धी महामार्गाला नावे ठेवण्याचा प्रकार झाला. त्या आडून ना. देवेंद्र फडणवीस आणि ना. एकनाथराव शिंदे ह्यांच्यावर चिखलफेक करण्याचा काही राजकीय मंडळींकडून प्रयत्न देखील झाला.

Samruddhi Mahamargह्या संदर्भात इंडिया इनपुट ने त्याच दिवशी आपल्या पाहणी अहवालाचे ठळक मुद्दे प्रकाशित केले आणि Samruddhi Mahamarg वर अपघात कां घडतात त्याची प्रमुख कारणे आणि ती कशी टाळता येतील ह्यावर विस्तृत भाष्य केले. त्यानंतर वाचकांच्या प्रतिसादाचा अक्षरशः पाऊस पडला. ट्विटर, ई मेल् आणि अन्य सोशल मीडिया मंचावरून वाचकांनी आपल्या अनुभवांना शेयर केले आणि आपल्या आपल्या परीने उपाय सुचविले. सर्व वाचकांनी इंडिया इनपुट च्या रिपोर्ट ची प्रशंसा केली ह्याबद्दल ऋणी आहोत. आपण प्रतिक्रिया दिल्यात त्याबद्दल मनस्वी धन्यवाद. त्यापैकी निवडक प्रतिक्रिया इथे देत आहोत.

“प्रत्येक अर्ध्या तासांनी ले बाय हवा, तिथे चहा, स्नॅक्स अशी रेफ्रेशमेंट्स हवीत, प्रसाधनगृहे हवीत. तणाव घालवता यावा आणि रिलॅक्स करता यावे,” अशी आणखी एक सूचना कित्येक वाचकांनी मांडली. “कित्येक वेळा दूर पर्यंत कुणीच दिसत नाही, त्यामुळे, कंटाळवाणे होते. नवख्याना भीती देखील वाटण्याची शक्यता आहे. म्हणून, अधून मधून पेट्रोलिंग गाड्या दिसल्या तर बरे वाटेल. सध्याचा काळ पाहता, वाहन चालक आणि प्रवाश्याना सुरक्षितता वाटावी अशा उपाय योजना केल्या पाहिजेत,” असे ही काही जण म्हणाले.

मात्र एक बाब सर्व प्रतिक्रियांमध्ये होतीच. सर्वानी ‘इंडिया इनपुट’ चा निष्कर्ष उचलून धरला आणि म्हटले,” समृद्धी हाय वे वर प्रवेश करण्याआधी चालकांचे प्रबोधन आणि वाहनांची तपासणी हवीच!”

काही निवडक प्रतिक्रिया इथे सादर करीत आहोत.

“पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर उपाययोजना हव्यात!”

महाराष्ट्राचे सुपरकॉप, माजी पोलीस महानिरीक्षक आणि सेवानिवृत्त आय पी एस अधिकारी श्री प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया अशी, “जी काही संभाव्य कारणे असू शकतात ती समोरच आहेत. ह्यातून उपाययोजना करायची आहे जेणेकरून अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. एंट्री पॉइंट्स वर वाहन चालकांकरिता कार्यशाळा घ्याव्याच लागतील. त्यांची वाहने महामार्गाच्या प्रवासाच्या दृष्टीने योग्य स्थितीत आहेत किंवा नाहीत हे चेक करावे लागेल. शिवाय, खाजगी ट्रॅव्हल्स च्या बसेस आणि एस टी बसेस ह्यांचे करिता समृद्धी महामार्ग रात्री साडे बारा ते पहाटे पाच ह्या वेळे पर्यंत बंद करावे लागेल असे दिसते. कारण, ह्या काळात ड्रायव्हर्स चा डोळा लागण्याचा, गुंगी ची डुलकी येण्याचा अधिक धोका संभवतो.. आणि ड्रायव्हर ला डुलकी लागणे अत्यंत घातक आहे.”

“रस्ता तयार आहे, पण..”
Samruddhi Mahamarg
इन्फ्रास्ट्रक्चर आणि औद्योगिक प्रकल्पांसंबंधी घडामोडींवर बारीक लक्ष ठेवणारे आणि त्यासंबंधी सातत्याने लिखाण करणारे धनंजय देशमुख ह्यांनी ‘इंडिया इनपुट’ चे ट्विट रिट्विट केली आणि त्यावर कॉमेंट द्वारे ते व्यक्त झाले. ते म्हणतात, “रस्ता विषय बाजूला ठेवला तर मुळात, तुम्ही, तुमची गाडी सलग ४ तास १२० किमीच्या वेगाने चालवू /चालू शकतात? १०-१५ किमी एखाद्या वेळेस चालवली म्हणजे आपण महामार्गावर गाडी दामटू शकतो हा अट्टाहास आहे. रस्ता तयार आहे, पण चालणार्‍या गाड्या आणि चालवणारे तयार नसतील तर रस्त्याला दोष देणे ठीक?”
ते पुढे लिहितात, “समृद्धी महामार्ग सारख्या रस्त्यांची कुवत आहे १२०+  किमी वेगाने गाडी धावू देण्याची, पण याउलट, खरे हे छातीठोकपणे किती सांगू शकतील? टायर बेस महत्वाचा असतो. गाड्यांची पडताळणी करून त्यांना परवानगी देणे किंवा नाकारणे. माहितीपूर्ण लेख !”
“कोणतीही यात्रा ‘अंतिम यात्रा ‘ होऊ नये..”
सीनिअर प्रोजेक्ट एक्झिक्युशन प्रोफेशनल असलेले, व्यवसायाने केमिकल इंजिनीयर आणि मध्य पूर्वेच्या देशांत आणि यू एस मध्ये वाहन चालविण्याचा अनुभव असलेले चंद्रकांत दीक्षित म्हणाले, “वाहन चालवीत असताना सुरक्षेची काळजी घेणे अगत्याचे आहे. नव्हे, ते अनिवार्यच होय! वाहनांची योग्य निगा राखली गेली पाहिजे आणि हायवे वर येण्याआधी तर विशेषत्वाने आपले वाहन त्या दृष्टीने योग्य अवस्थेत आहे अथवा नाही, टायर्स काही ठिकाणी जीर्ण तर झाले नाहीत ना, ते योग्य स्थितीत आहेत किंवा नाहीत, त्यातील प्रेशर महामार्गाची सतत ची गतिशील ड्रायव्हिंग चा ताण तणाव सहन करू शकेल अथवा नाही हे सारे काळजीपूर्वक बघितले गेले पाहिजे. हे प्रत्येक वाहन मालक आणि चालकाचे कर्तव्यच होय! महामार्गावर योग्य गती राखणे आणि ड्रायव्हर ने आपल्या मानसिक थकव्यावर नियंत्रण ठेवणे सारखेच महत्त्वाचे आहे. मद्य घेणे हा थकवा किंवा शिण घालवण्याचा मार्ग कधीच होऊच शकत नाही. तसेच, मद्यप्राशन करून ड्रायव्हिंग करणे काही ‘हिरोईजम’ नव्हे.. तसे करण्याचा मोह आवरता आला पाहिजे. अन्यथा ही यात्रा अंतिम यात्रा होऊ शकते, हे ध्यानात ठेवावे.”
“रस्ता दुभाजकाला चिकटून कां चालवायचे?”
ज्येष्ठ वृत्त छायाचित्रकार राजेश जोशी म्हणतात, “प्रतिबंध असतांनाही अवजड वाहने सतत रस्ता दुभाजकाला चिकटून फास्ट लेन मध्ये चालवणे हे अपघातांचे एक प्रमुख कारण आहे! नुकत्याच घडलेल्या भीषण अपघातात देखील अवजड बस दुभाजकाला चिकटुनच धावत होती.
यावर वाहतूक पोलीस आणि महामार्ग प्रशासन कोणतीही कारवाई करत नाहीत.”
“नियमात राहून वाहन चालवले नाही तर, चूक कुणाची?”

Samruddhi Mahamargएका सेवानिवृत्त अभियंत्याचा अनुभव बोलका आहे. “जानेवारी महिन्याची गोष्ट आहे. माझ्या मुलाने आमची जुनी गाडी सुद्धा वेगाने चालवली, तेव्हा आम्हा सर्वाना त्याचे कौतुक वाटत होते. त्याने छान चालवली ह्यात शंका नाही. पण, आम्ही त्या महामार्गावर पहिल्यांदा जात असल्याने वेग मर्यादे कडे फारसे लक्ष दिले नाही. ताशी १२० किलोमीटर वेग मर्यादे पुढे आमची गाडी धावत होती. त्यामुळे, आम्ही अत्यंत कमी वेळेत नागपूरला पोहोचलो . पण जेव्हा आम्हाला चालान बद्दल समजले तेव्हा आम्हाला धक्काच बसला. महामार्ग बनवणाऱ्या नेत्यांवर थोडा राग सुद्धा आला. चालान चे हजारो रुपये भरावे लागले, म्हणून, मला आणि माझ्या मुलाला राग येणे स्वाभाविक होते. माझा मुलगा म्हणू लागला की एक्सप्रेस हाय वे वर वेगात वाहन चालवायचे नाही तर काय करायचे? इथे देखील शंभर एकशे वीस पर्यंत गाडी चालवायची तर मग महामार्गाचा खरा आनंद कसा घायचा? मग, ह्या लोकांनी महामार्ग कशालाच बनवला? काय गरज होती?”

“पण, नंतर अपघातांविषयी बातम्या येत गेल्या तेव्हा समजले की तिथे अपघात कसे घडत असतील. आम्हाला कळले की चूक माझ्या मुलासारख्या वाहन चालकांची आहे. आपण वेग मर्यादेत वाहन चालवले तर ते नियंत्रणात राहते आणि तोल सुटत नाही. ह्या महामार्गाची कल्पना करणाऱ्या आणि महामार्ग बनवणाऱ्या देवेंद्र जी फडणवीस आणि एकनाथजी शिंदे यांनी एक उत्तम आणि सुंदर महामार्ग बनवला आहे.पण, वाहन चालकांनी आता स्वतः मध्ये आवश्यक तो सुधार केला पाहिजे. मी स्वतः इंजिनियर असून माझा मुलगा देखील इंजिनियर आहे. म्हणून, मी माझ्या मुलाला समजावले की आपण कोणतेही विजेचे किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरण विकत घेतो तेव्हा त्याचे सोबत एक मॅन्युअल येते, ते वाचतो. मग, ते उपकरण हाताळायला शिकतो. त्याच प्रमाणे आपण Samruddhi mahamarg वर प्रवेश करण्याच्या आधी त्याविषयी आवश्यक नियम समजून घेतले पाहिजे आणि त्यानुसार वागले पाहिजे. तसे केले नाही तर आपली, आपल्या वाहनांची आणि इतरांची सुरक्षा धोक्यात येईल. मग तो दोष महामार्ग बनविणाऱ्यांचा नाही तर आपला असेल. माझे म्हणणे माझ्या मुलाला देखील पटले.आता त्याने नवीन महागडी एस यू व्ही विकत घेतली असून आम्ही त्याने महामार्गावर जातो आणि आनंदात प्रवास करतो. समृद्धी वरील प्रवास माझा तीन वर्षांचा नातू खूप एन्जॉय करतो ! नियमात राहून आपले काम करण्यात खरा आनंद आहे.”

(सर्व छायाचित्रे: इंडिया इनपुट टीम)
आपल्या प्रतिक्रिया आणि सूचनांची प्रतीक्षा ह्या ई मेल वर आहे..
contactindiainput@gmail.com 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

four × five =

Back to top button