मराठी
VEDIC MATHS: वैदिक गणित अध्ययनाची गरज कां आहे!
शाळेच्या विद्यार्थ्यांना गणिताची धास्ती कां वाटते? विचारताहेत, वैदीक गणित तज्ञ शेफाली जोशी!
Vedic Maths वैदिक गणित हे भारतीय मातीत उपजलेलं आणखी एक शास्त्र ज्याचा उपयोग अनेक देश करून घेत आहेत. जगभरात हे शास्त्र Ancient Mathematics, Indian Mathematics आदी विशेषणांनी लोकप्रिय झाले आहे.
सदर लेखात म्हटल्याप्रमाणे, ‘भारतातील प्राचीन विद्या म्हणजे केवळ धर्मग्रंथ नसून पूर्णपणे विज्ञानावर आधारित जीवन जगण्याच्या कला होत्या. संशोधक वृत्तीने अभ्यास केल्यास अत्यंत अचूक, कमीतकमी शब्दांत, वेगवान अशा विस्मयकारक वैदिक गणित पद्धती दृष्टीला पडतात.’
वैदिक गणितातील ज्ञानाने तेथील विद्यार्थ्यांना गणित विषय जवळचा मित्र वाटू लागला असून तिथे गणिताचा तिटकारा कमी होतो आहे.
दुर्दैवाने, अगदी ह्या उलट वैदिक गणिताच्या मूळ देशात म्हणजे आपल्या कडील परिस्थिती आहे. ह्याच महत्वपूर्ण विषयावर वैदिक गणित संशोधिका व अध्यापिका शेफाली राजेश जोशी ह्यांनी लिहिलेला हा लेख.
खरंतर शाळेत शिकणाऱ्या लहान मुलांची नवनवीन गोष्टी आत्मसात करण्याची शक्ती अतिशय तीक्ष्ण असते. कारण त्याची बुद्धी, मन आणि स्मृती म्हणजे अगदी कोरी पाटीच असते. म्हणूनच या कोवळ्या मनांवर एखादी चांगली गोष्ट कोरणे हे शिक्षकांसाठी अत्यंत आवडीचे काम असते. बालमनाचा कानोसा घेऊन त्यांच्या अवतीभोवती असलेल्या गोष्टींची मनोरंजक उदाहरणे दिली की मुले पटकन लक्षात ठेवतात. बालवयाला संस्कारक्षम मन असे म्हटले जाते ते याचकरिता. घरात आईबाबा, आजीआजोबा, मित्रमंडळी यांच्या अनुकरणाने बालके सतत ज्ञान ग्रहण करत असतात. परंतु शाळेत प्रवेश केल्यानंतर त्यांना औपचारिक गुरु प्राप्त होतात, ते म्हणजे आम्ही शिक्षक मंडळी असतो. अनेक नामवंत संशोधक मंडळींच्या अनुभवजन्य ज्ञानातून सिद्ध केलेला शालेय अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी आमच्यावर आलेली असते. बालकांचे भविष्य घडवण्याचे महान पुण्यकर्म करणारे शालेय शिक्षक हे पुढे त्याच्या आयुष्यातल्या यशाचे शिल्पकार असतात.
माणसाच्या आयुष्यात अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या अनेक विज्ञानशास्त्रांचा पाया म्हणजे गणित होय. गणिताच्या ज्ञानाने विद्यार्थ्यांची तर्कबुद्धी आणि आकलनक्षमता विकसित होत जाते. फार पुढे जाऊन विचार केला नाही तरी दैनंदिन जीवनात आवश्यक असणारे व्यवहारज्ञान सुद्धा गणितामुळेच येते. अगदी अशिक्षित माणसालादेखील आकडेमोड येणे गरजेचे असतेच.
परंतु असे असतांना देखील साधारण शालान्त परीक्षेपर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये बऱ्याच अंशी गणिताबद्दल तिटकारा आणि धास्ती आढळून का येत असावी ? याचे उत्तर शोधून समाधान करणे हे शिक्षकांसाठी एक आव्हान होऊन बसलेले आहे.
गणितात अनास्था उत्पन्न झालेले विद्यार्थी नंतर हळूहळू सर्वच विषयांत मागे पडत जातात. कित्येकदा शाळाच सोडून देतात. ‘ड्रॉपआऊट’ चा ठप्पा कपाळावर लावून कसेबसे आयुष्य कंठतात. ही वेदनादायक वस्तुस्थिती आम्हा सर्वांना कुठेतरी अंतर्मुख व्हायला भाग पाडते.
या गणितविषयक भयगंडाची शिकार होऊन मुलांची प्रगती खुंटणे, या समस्येच्या मुळाशी जाऊन विचार केल्यास अनेक छोटी छोटी परंतु महत्वाची कारणे सापडतात.
१) आकडे मोजणे, बेरीज वजाबाकी यांचा उपयोग समजावून न सांगता घोकंपट्टी करण्याची सक्ती करणे.
२) धाकदपटशा दाखवून जबरदस्तीने विषय गळी उतरवण्याचा प्रयत्न करणे.
३) आपण शिकवत असलेल्या गणित प्रकाराचा आधी व्यवहारातला उपयोग समजावून न सांगणे.
४) विद्यार्थ्यांच्या कुतूहलातून आलेल्या प्रश्नांची संयमाने उत्तरे न देणे.
५) केवळ पुस्तकाला प्रमाण मानून त्यानुसारच चालण्याचा आग्रह धरणे.
६) विषयाशी संबंधित परंतु पुस्तकात नसलेल्या अवांतर प्रश्नांना, माहितीला अजिबात महत्व न देणे.
७ ) निव्वळ परीक्षा उत्तीर्ण करण्याचा संकुचित दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवणे.
८) प्रचलित गणित शिक्षण हे पारंपरिक पाश्चिमात्य क्लिष्ट पद्धतींचे आहे, त्यांचाच आग्रह धरणे.
उपरोक्त घोडचुका या सर्वसाधारणपणे अनेक गणित शिक्षकांच्या हातून कळत नकळत होत असतात. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची धास्ती किंवा तिटकारा प्रचंड प्रमाणात निर्माण झालेला सर्वदूर ऐकायला मिळतो.
कित्येकदा दहावीची परीक्षा कशीबशी उत्तीर्ण झाल्यावर “सुटलो बुवा एकदाचा गणिताच्या तावडीतून ! आता आर्टस किंवा बायोलॉजी घेणार.” असे उद्गार काढणारे बहुसंख्य विद्यार्थी आहेत.
याउलट ज्यांना गणिताचे उत्तम शिक्षक लाभले अशा जिज्ञासू विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि नव्या आव्हानांना तोंड देण्याची तयारी आढळते. भौतिकशास्त्र, अभियांत्रिकी, वास्तुविशारद अशी उत्तमोत्तम क्षेत्रे त्यांच्याकरता खुली असतात. आजच्या विज्ञानयुगात गणितावर प्रभुत्व मिळवणे हा सफल आयुष्याचा मूलमंत्र झालेला आहे.
गणित विषयाचे सहजगामी अध्ययन आणि अध्यापन करण्याकरिता प्रचलित शिक्षण पद्धतीतील घातक दोष अगोदर लक्षात घेतले पाहिजेत. ब्रिटिश राजवटीत सर्वत्र रूढ झालेल्या परदेशी शिक्षण प्रणालीचा आजही “लकीर के फकीर” झालेल्या शासकीय अधिकारी आणि शिक्षकांवर घट्ट पगडा बसलेला आहे. त्यांपेक्षा कितीतरी उन्नत, सुलभ आणि आजही काळानुरूप असलेल्या आपल्या प्राचीन भारतीय पद्धतींना परदेशी राज्यकर्त्यांनी पडद्याआड केले. भारतातील प्राचीन विद्या म्हणजे केवळ धर्मग्रंथ नसून पूर्णपणे विज्ञानावर आधारित जीवन जगण्याच्या कला होत्या. संशोधक वृत्तीने अभ्यास केल्यास अत्यंत अचूक, कमीतकमी शब्दांत, वेगवान अशा विस्मयकारक वैदिक गणित पद्धती दृष्टीला पडतात.
प्रचलित पाठ्यपुस्तकांत दिलेल्या पाश्चिमात्य पद्धती अतिशय लांबलचक, वेळखाऊ आणि गुंतागुंतीच्या असल्याचे नंतर जाणवते. आपल्या वेदशास्त्रांत व्यवहारसुलभ अशी गणिताची नेमकी सूत्रे तपस्वी ऋषीमुनींनी सामान्य विद्यार्थ्यांकरिता लिहून ठेवलेली आहेत. कमीतकमी शब्दांत, अचूक उत्तराची खात्री देणाऱ्या या सूत्रांचा अभ्यास करणेही शिक्षकांकरिता आणि पर्यायाने विद्यार्थ्यांकरिता फारच सोपे झाल्याचा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी ‘वैदिक गणित अभ्यासवर्गात’ घेतलाच असेल. मोठमोठे गुणाकार, भागाकार फक्त तोंडी सोडवणारे वैदिक गणिताचे अभ्यासक म्हणजे अनेकांना चमत्कार वाटतात. पण त्यामागे दैवी शक्ती नसून आपल्या प्राचीन गणिताचा तर्कशुद्ध अभ्यास आणि सततच्या सरावाने आलेले प्रभुत्व असते.
वैदिक गणिताची मूलभूत सूत्रे ही विद्यार्थ्यांना सहज आत्मसात होतात. स्वतः मोठमोठे पाढे तयार करण्याची विद्या प्राप्त झाली म्हणजे त्यांना गणित हा एक खेळ वाटू लागतो. मग एकदा विषयात गोडी निर्माण झाली की त्यांच्या प्रगतीचा वेग थक्क करणारा असतो. टाळाटाळ न करता स्वतःहून शिक्षकांना अधिकाधिक गृहपाठ मागणारे विद्यार्थी, हा चमत्कार अनेक वैदिक गणित शिक्षकांनी प्रत्यक्ष अनुभवला आहे. स्पर्धेच्या युगात सतत विजय मिळवणे ही सवय आपल्या विद्यार्थ्यांना लावणारा सफल शिक्षक हा पुढे त्यांच्या जीवनात आदर्श बनून नेहमीकरिता स्मरणात राहतो.
निरन्तर सकारात्मक चिंतन, मनन आणि संपूर्ण विश्वाला मार्गदर्शक ठरलेल्या प्राचीन वैदिक गणिताचे अध्ययन हा आधुनिक शिक्षकांसाठी मूलमंत्र आहे.
संपर्क:
शेफाली राजेश जोशी,
वैदिक गणित संशोधिका व अध्यापिका
सम्पर्कध्वनी : 9403591500 (WhatsApp)
email : shaifaliguptajoshi@gmail.com