#WorldTribalDay: भारतीयांसाठी औचित्यहीन विश्वमूलनिवासी दिन!
वसाहतवाद्यांच्या अत्याचाराला, नरसंहाराला बळी पडलेल्या मूलनिवासी लोकांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा दिवस..

#WorldTribalDay: भारतीयांसाठी औचित्यहीन विश्व मूलनिवासी दिन! या मागे काय कारणे आहेत? असं कां म्हणताहेत डॉ. छाया नाईक, वाचू या..
डॉ. छाया नाईक
९ ऑगस्ट १९८२ रोजी संयुक्त राष्ट्र संघाने जिनेव्हा येथे आदिवासी लोकांच्या हितरक्षणासाठी एक बैठक आयोजित केली होती. १९९४ च्या डिसेंबर मध्ये संयुक्त राष्ट्र संघात आदिवासी लोकांवर होणाऱ्या अत्याचारावर सविस्तर चर्चा झाली. त्याच बैठकीत निर्णय घेण्यात आला की दर वर्षी ९ ऑगस्ट हा दिवस विश्व मूलनिवासी दिवस म्हणून साजरा करण्यात यावा व प्रत्येक देशातील आदिवासींच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. त्यामुळे ९ ऑगस्ट १९९५ पासून हा दिवस विश्व मूलनिवासी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
#WorldTribalDay: भारतीय इतिहासाचे विकृतीकरण आणि आम्ही!
भारतीय इतिहासाचे लेखन करणाऱ्यात लॉर्ड मेकॉले हा शिक्षणतज्ञ महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतो. भारतीयांना शिक्षण द्यायचे ते त्यांच्या विकासासाठी व पर्यायाने भारताच्या उत्थानासाठी असे त्याला कधीच वाटत नव्हते. त्याला येथील बुद्धिमान तरुणांना शिक्षण देऊन सुशिक्षित काळे इंग्रज तयार करायचे होते. त्यामुळे येथील शिक्षणाचे माध्यम संस्कृत नव्हे तर इंग्रजीच हवे, शिक्षण घेणाऱ्यांचा संबंध भारतीय संस्कृतीशी येऊ नये म्हणून शाळा सुदूर ठिकाणी रहातील, शाळांमध्ये स्थानिक भाषा बोलली जाऊ नये असे काही दंडक त्याने घातले. १८३० ते १८४० या सुमारास भारतातील शिक्षण संस्था बंद करून इंग्रजी शिक्षण देणाऱ्या संस्था त्याने सुरु केल्या. या शाळांमधून शिक्षण घेतलेल्या “काळ्या इंग्रजी मेकॉले पुत्रांनी” भारतीय संस्कृतीशी पूर्णपणे फारकत तर घेतलीच, पण भारतीय समाज हा जुनाट, भिकारडा, अडाणी,सतत पराभूत होणारा, जातीभेदाने पोखरलेला असून इंग्रजी राज्य हे आपल्यासाठी वरदान आहे असा समज जनमानसात दृढ करणाऱ्या पिढ्यांमागून पिढ्या तयार केल्या. अजूनही या बुद्धीभ्रमातून आपला उच्च विद्याभूषित बाहेर पडलेले नाहीत.
मेकॉलेला साथ मिळाली ती मॅक्समुल्लर या जर्मन विद्वानाची. त्याने वेदांचे आणि उपनिषदांचे भाषांतर केलेले असल्यामुळे त्याची विद्वत्ता वादातीत होती. भारतावर राजकीय गुलामगिरी लादल्यावर धार्मिक आणि सांस्कृतिक गुलामगिरी लादणे, येथे दीर्घकाळ राज्य करण्यासाठी आवश्यक होते. त्यासाठी तोपर्यंत प्रचारात आलेला भारतावर झालेल्या “आर्यांच्या आक्रमणाच्या सिद्धांता”ची म्हणजे आर्यन इन्व्हेजन थिअरीची त्यांना मदत झाली. आर्य हे मुळचे भारतीय नसून पश्चिमोत्तर दिशेने भारतात आक्रमक म्हणून आले होते असे प्रतिपादित करणाऱ्या या सिद्धांताची सविस्तर ओळख आणि त्यातल्या भ्रमित करणाऱ्या खोट्या बाबींवर नंतर कधीतरी!
कोणताही वैज्ञानिक किंवा शास्त्रीय पुरावा नसलेल्या या सिद्धांताच्या मदतीने इंग्रजांनी येथील समाजात फूट पाडायला सुरुवात केली. ज्याप्रमाणे हजारो वर्षांपूर्वी पश्चिमेकडून आर्यांनी भारतावर आक्रमण करून, येथील पराभूत जनतेला दक्षिणेकडे पिटाळून लावले किंवा त्यांना आपली संस्कृती स्वीकारण्यास बाध्य केले आणि त्यांनी तुमची ही संस्कृती निर्माण केली त्याच प्रमाणे आता इंग्रज आले आहेत. एच.एच. विल्सन नावाच्या इंग्रज विद्वानाने स्पष्टच सांगितले की
“..It was to a certain extent the reunion of the great Aryan family, with the aim of civilizing and Christianizing India.”
भारतीय समाजाला ‘सुसंस्कृत’ करण्यासाठी भारतातील सर्व समाजाचे ख्रिश्चनीकरण करायचे असे ठरवल्यावर त्यांनी त्यादृष्टीने पाउले टाकायला सुरुवात केली.
दक्षिण भारतात त्यांनी अपप्रचार सुरु केला की आर्यांनी तुमच्या द्रविड संस्कृतीचा नाश करून तुमच्यावर वेदिक धर्म लादला आहे. तो सोडून खिश्चन व्हा. त्यातच तुमचे कल्याण आहे. गोवा आणि दक्षिण भारतात आजही त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसत आहेत.
त्याच बरोबर त्यांनी येथील जनजाती समाजाला पराभूत करून जंगलांच्या खूप अंतर्गत भागात रेटले. त्यांचा गावांशी व शहरांशी संबंध येणार नाही अशी योजना तयार केली. मुळात वनात राहणारे ते वनवासी अशी ज्यांची ओळख होती, ज्यांचा येथील जंगल, जल व जमिनीवर हक्क होता त्यांना दरिद्री आणि चोर ठरवून त्यांच्या वेगळ्या वसाहती तयार केल्या व त्यांनाही येथील नागरी संस्कृतीपासून विभक्त केले. त्यांना ‘आदिवासी’ अशी संज्ञा देऊन तेच या देशाचे मूळ नागरिक असून बाकी सगळे बाहेरून आलेले आक्रमक आहेत व तुमच्या दुरवस्थेला तेच जबाबदार आहेत असा येथील व्यक्ती व्यक्तीला एकमेकांपासून विभक्त करणारा अपप्रचार त्यांनी केला. या जहरी अपप्रचाराचे विष इतके जहाल होते की आज इंग्रजांचे शासन जाऊन पाउणशे वर्षे झाली तरी ते विष पूर्णपणे उतरले नाही. त्याला अर्थात आपली शासन यंत्रणाही जबाबदार आहेच. त्याच्या जोडीला आपली समाज माध्यमेही आहेतच.
#WorldTribalDay: आदिवासी म्हणजे काय?
युरोपियन वसाहतवाद्यांनी इसवी सनाच्या १३व्या शतकपासून आपली मोठाली जहाजे घेऊन व्यापाराच्या मिषाने जगभर भ्रमंती सुरु केली. आफ्रिकेतील लोकांना शस्त्रास्त्रांच्या जोरावर कैद करून गोऱ्या लोकांच्या घरी व शेतावर आणि कारखान्यांमध्ये राबण्यासाठी गुलाम म्हणून त्यांची विक्री सुरु केली.
त्याच बरोबर अमेरिकेतील मूळ निवासी लोकांना – ज्यांना ते इंडियन्स म्हणत व आपण रेड इंडियन्स म्हणून ओळखतो – त्यांचा नरसंहार करून तेथील जमिनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली. ऑस्ट्रेलीयातील मूळ निवासी लोकांना – ज्यांना ते अबोरिजीनल म्हणत – त्यांचाही त्यांनी नरसंहार केला.
तेथील साधन संपत्तीवर अधिकार मिळवून तिची लूट करणे, हाच त्यांचा मुख्य उद्देश होता. आज अमेरिका व ऑस्ट्रेलियात हे मूळ निवासी लोक जवळजवळ नामशेष होत आले आहेत. जे आहेत त्यांची त्यांच्या मूळ संस्कृती पासून पूर्णपणे फारकत झालेली आहे.
#WorldTribalDay: आपल्याकडे अशी स्थिती आहे का?
प्राचीन भारतात येथील समाजाचे नगरवासी, ग्रामवासी व वनवासी असे तीन भाग होते. शहरात राहणारे ते नगरवासी, खेड्यांमध्ये राहणारे ते ग्रामवासी व जंगलांमध्ये राहणारे ते वनवासी. आपली खेडी जशी स्वयंपूर्ण होती तसेच वनांमध्ये राहणारा वनवासी समाज हा सुद्धा स्वयंपूर्ण होता. जंगलात मिळणाऱ्या नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट न करता तिचे रक्षण करून व दोहन करून जगात होता. आपल्या वनांचे व तेथील नैसर्गिक साधन संपत्तीचे रक्षण करत होता. अनेक शूर वीर योद्धे – राजे आणि राण्या अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपल्या वनातील राज्याचा शकट हाकीत होते. नागपूर आणि त्याच्या सभोवतालच्या भागावर शासन करणारे गोंड राजे हे याच समाजाचे.
येथील ग्रामवासी किंवा नगरवासी राजांनी या वनवासी लोकांवर आक्रमण करून त्यांचा वंश विच्छेद केल्याचा इतिहास नाही. या समाजावर खरे अत्याचार केले ते साम्राज्यवादी आणि वसाहतवादी इंग्रजांनी आणि युरोपियन्स लोकांनी. पण ऑस्ट्रेलिया किंवा अमेरिकेसारख्या पाश्चात्य देशांमध्ये तेथील आदिवासी लोकांचा जो नरसंहार या लोकांनी केला, त्यांचा वंशविच्छेद करण्याच्या योजना त्यांनी क्रियान्वित केल्या त्याला मात्र जागतिक इतिहासात तोड नाही.
या आपल्या दुष्कृत्यांचे परिमार्जन करण्यासाठी किंवा आम्हीच खरे मानवतावादी आहोत हे जगाला सांगण्यासाठी आज त्यांनी ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक मूलनिवासी दिन म्हणून साजरा करावा असे फर्मान काढले.
#WorldTribalDay: ९ ऑगस्टला नक्की काय घडले?
नोव्हेंबर १८१३ ते जानेवारी १८१४ या कालखंडात अमेरिकन सैन्याने मिसिसिपीच्या क्षेत्रात आक्रमण करून स्थानिक लोकांना पिटाळून लावायचे ठरवले. या आक्रमणात २७ मार्च १८१४ ला तीन हजार अमेरिकन सैनिकांनी क्रीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागावर आक्रमण केले. क्रीक या शब्दाचा अमेरिकन अर्थ लहान नदी असा आहे. या ठिकाणी झालेल्या युद्धाला बॅटल ऑफ हॉर्स शू बेंड असे म्हणतात. त्याठिकाणी एकाच दिवसात आठशे रेड इंडियन सैनिक मारले गेले. त्यामुळे अर्थातच त्यांची सैन्य शक्ती कमी झाली. रेड इंडियन लोकांची डोकी कलम करून आणणाऱ्या गोऱ्यांना ५ ते ५० डॉलर्स बक्षीस मिळत असे. त्यामुळे त्या काळात दीड लाख लोकसंख्या असलेल्या आदिवासी लोकांची संख्या तीस हजारापेक्षाही कमी झाली. त्यांच्या जमिनी हडपण्यासाठी त्यांना नदीच्या पलीकडे पिटाळण्यात आले. शेवटी ९ ऑगस्ट १८१४ ला तेथील मूळ रहिवासी व अमेरिकन सरकार यांच्यात एक करार झाला. त्या करारानुसार तेथील आदिवासींच्या जमिनीपैकी २ कोटी ३० लाख एकर जमीन अमेरिकन सरकारला मिळाली. तत्पूर्वी ९ ऑगस्ट १६१० ला ब्रिटीश सेनेने व्हर्जिनिया जवळील पौहटन नावाच्या कबिल्यावर हल्ला करून पास्पहेघ जमातीच्या ७५ लोकांची निर्घृण हत्या केली होती.
जगभरात आदिवासी किंवा मूलनिवासी लोकांवर झालेले हे अत्याचार, त्यांचा नरसंहार लक्षात घेता ९ ऑगस्ट हा दिवस हर्शोल्लासाने साजरा करायचा नाही तर वसाहतवाद्यांनी आपल्या वसाहती स्थापन करण्यासाठी स्थानिक लोकांवर केलेल्या अत्याचाराच्या – त्यांच्या नरसंहाराच्या इतिहासाला साक्ष ठेऊन बळी पडलेल्या मूलनिवासी लोकांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा आहे.
आपण सर्वच जण भारतातील मूलनिवासी किंवा आदिवासीच आहोत. आपल्यापैकी जे लोक वनात राहत होते त्यांना आता जनजाती अशी ओळख आहे. त्यांच्या जल, जमीन व जंगलातील अधिकारांसाठी सध्याच्या सरकारने कायदे केलेले आहेत. त्यांच्यासाठी जो दिवस आनंदाने साजरा करायचा तो एखाद्या जनजाती समाजाचा गौरव वाढविणाऱ्या नेत्याचा जन्मदिवस असावा असा विचार पुढे येत आहे. त्यादृष्टीने बिरसा मुंडा यांची जयंती १५ नोव्हेंबरला साजरी करावी. त्यात सर्वांनी आनंदाने सहभागी होऊन एकात्म भारतीय समाजाचा सर्व जगाला परिचय द्यावा असे वाटते. असे केले तरच तो खऱ्या अर्थाने जनजाती गौरव ठरेल.
डॉ.छाया नाईक, नागपूर
संपर्क भ्रमण ध्वनी 9890002282.
For more on the World Tribal Day :
https://www.un.org/en/observances/indigenous-day
A Note :
August 9th is celebrated as World Tribal Day (also known as International Day of the World’s Indigenous Peoples) to raise awareness about and protect the rights of indigenous populations globally. This date commemorates the first meeting of the UN Working Group on Indigenous Populations in 1982. However, Bharat or India, being the most ancient country, with its past spanning several thousand years and with its glorious rich traditions and heritage, doesn’t fit in the modern western stereotype, says the writer. We welcome your feedback. – Editor.
More from http://www.indiainput.com
#India’s Nayara Energy ships Pivots diesel cargo to China !!
India’s New Income Tax Bill 2025:Key Changes & Simplifications