मराठी

तुकाराम गाथा: व्यंगकाराच्या चिकित्सक नजरेतून..

ऐन सणासुदीच्या काळात, महाराष्ट्राच्या अन्न आणि औषधी विभागातील विद्यमान आयुक्तांच्या कारवायांनी उत्पन्न झालेल्या परिस्थितीवर विजय लिमये यांच्या खास शैलीतून विनोदी फटकारे..

तुकाराम गाथा: ऐन सणासुदीच्या काळात, महाराष्ट्राच्या अन्न आणि औषधी विभागातील विद्यमान आयुक्तांच्या कारवायांनी उत्पन्न झालेल्या परिस्थितीवर खास व्यंगकाराच्या चिकित्सक शैलीतून विनोदी फटकारे.. 

 

विजय लिमये

 

महाराष्ट्रात सध्या तुकाराम मुंढे नावाचे वादळ घोंगावत आहे. हॉटेल व्यवसायिकांच्या भाषेत सांगायचे तर तुकारामांनी सगळीकडे अगदी उच्छाद मांडला आहे.

 

दररोज पेपर उघडला, मुंढेच्या करामती वाचायला मिळतात, त्यात अमुक ठिकाणी धाड पडली, तमुक हॉटेल बंद केले, अगदी रम बनवणारी कंपनी पण सुटली नाही. थोडक्यात काय आमच्या सारख्या सामान्य लोकांशी इतकी वर्ष बनवाबनवी सुरु होती. अजून ताज आणि ओबेरॉय नावे वाचनात नाहीत, अर्थात त्याची आम्ही वाट पाहत आहे.

 

तुकाराम मुंढे असेच खाद्यपदार्थ व्यवसायिकांवर, हॉटेलवर कारवाई करत राहतील तर? आमची पंचाईत होईल.

 

तुकाराम गाथा

 

माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनात उगीचच खुळसट विचार येऊ लागले आहेत, जर अति शुद्ध खाणे सगळ्यांनी सुरू केले तर आम भारतीयांची प्रतिकारशक्ती ढासळेल, त्यामुळे भविष्यात मुंढेंची सहा महिन्यात बदली झालीच तर? तसा इतिहासच आहे हो, म्हणून विचार येतात…ते गेल्यानंतर आम्ही पुन्हा रस्त्यावरचे गलिच्छ वातावरणातील चटक मटक खाऊ लागलो तर आमची प्रकृती ढासळेल आणि याला केवळ मुंढे जबाबदार राहतील.

 

सध्या हॉटेल व्यवसायिकांवर शनीची/राहू / केतू ची महादशा आहे, एकूणच त्यांच्या व्यवसायात मंदी येण्याच्या शक्यतेने, महाराष्ट्राच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम होईल, त्यामुळे डॉक्टरांचे व्यवसाय मोडकळीस येतील, तसेच औषध कंपन्यांचा बाजार उठण्याची वेळ येईल. अन्न औषध प्रशासनातील कर्मचारी इतके वर्षाची अंगावरची धूळ झटकून कामाला लागले आहेत. त्यांचे हप्ते बंद झाल्याने त्यांच्या संसारावर उपासमारीची वेळ आली आहे. घोंगावत येणाऱ्या वादळाने सगळीकडे हाहाकार माजवला आहे. फुटकळ टीव्ही चॅनल वरील बातम्यांमध्ये तुकारामांना हटवण्यासाठी 250 कोटीची बोली लागली आहे असे ऐकिवात आले, खरे खोटे देवाभाऊंना आणि विरोधी पक्ष नेत्यांनाच माहिती असणार. आम्हाला चार आकड्यांच्या वरचे हिशोब येत नसल्याने, 25 वर किती शून्य लावली म्हणजे 250 कोटी होतात याच गणितात अडकून राहिलो.

 

तुकाराम गाथा

 

एकूणच सर्व व्यवसायांवर मुंढेंची वक्रदृष्टी आल्याने प्रत्येक व्यवसायिकांनी सावध राहावे. त्यांनी रस्त्यावर सकाळी लिंबू मिरची टाकल्यास, अथवा दुकानाच्या बाहेर लटकवल्यास सुद्धा कारवाई होऊ शकते.

 

तिकडे ट्रम्प तात्यांनी जागतिक मंदी आणली आहे, इथे तुकाराम बुआ दोन घास सुखाचे खाऊ देईनात, त्यातून खाद्य संस्कृतीत मंदी आली तर आम्ही काय करावे, याच विवंचनेत असल्याने कशातच मन लागेनासे झाले आहे.

 

शेजारच्या पाणीपुरीवाल्याने हातात हातामौजे घालून, पुरी भरताना बटाटा मिक्स, हिरवे व गोड पाणी तीन निरनिराळ्या चमच्यांचा वापर करून, देण्यास सुरुवात केल्याने पाणीपुरीची चव बिघडली आहे, त्यातील पूर्वीचा तो चमचमीतपणा, स्वादिष्टपणा पूर्णपणे नाहीसा झाला आहे.

 

भेळवाल्याचे तसेच झाले आहे. त्याचा तो कळकटलेला कपडा जो कदाचित त्याने कित्येक महिने धुतला ही नसेल त्याला हात पुसून दिलेली भेळ, त्या भेळीची चवच न्यारी.

 

जाऊदे, वाईट दिवस आले आहेत तसे ते एक दिवस जातील, आणि आम्ही जनता पुन्हा चविष्ट, चमचमीत, चवदार, पदार्थांनी जिभेचे चोचले पुरविण्यास सज्ज होऊ.

 

 

विजय लिमये
विजय लिमये

लेखक नागपूर येथे स्थायिक असून सामाजिक विषयाचे भान असलेले आणि संशोधक आहेत. र्यावरण वाचविण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी केलेल्या अनोख्या उपक्रमांचे जनसामान्यांपासून थेट पंतप्रधान मोदींपर्यंत सर्वानी कौतुक आणि स्वागत केले आहे. 

 

संपर्क: 9326040204

 

India Input

A web magazine viewed by readers across the globe. Created, owned and managed by INDIA INPUT COMMUNICATIONS, that brings out the latest interesting trends in India and outside on a range of topics, especially the important trends in geopolitics, social media, innovation, start ups, industry, business besides others.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button