मराठी

#GlobalGanesha: पुण्याहून आलेली गणेश मूर्ती सिंगापूर येथे विराजमान झाली!

सिंगापूरच्या महाराष्ट्र मंडळाच्या गणेशोत्सवाचा यावर्षीचा थाट सांगताहेत, नंदिनी नरेश नागपूरकर..

#GlobalGanesha: पुण्याहून आलेली गणेश मूर्ती सिंगापूर येथे विराजमान झाली! हो. खरेच असे झाले.श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट कडून हि मूर्ती पाठवण्यात आली होती. सिंगापूरच्या महाराष्ट्र मंडळाच्या गणेशोत्सवाचा यावर्षीचा थाट सांगताहेत, नंदिनी नरेश नागपूरकर..

सिंगापूर मध्ये मराठी समुदाय काही थोडाथोडका नाही, बरं. एका आकडेवारीनुसार, सुमारे तीन हजारावर मराठी परिवार इथे स्थायिक झालेले दिसतात. इथलं महाराष्ट्र मंडळ विख्यात आणि सक्रिय तर आहेच, शिवाय त्यांच्या सुनियोजित पद्धतीमुळे आणि कल्पकतेमुळे त्यांनी केलेली आयोजने छान चर्चित होतात.

 

महाराष्ट्र मंडळ सिंगापूर (MMS) चे मुख्य आयोजन म्हणजे, अर्थातच श्री गणेश उत्सव. बाप्पांच्या आगमनाची तयारी, आगमन, स्थापना, दररोज ची पूजा, आरती, सोबत गणेशोत्सवातील पारंपरिक कार्यक्रम असा सारा थाट तर असतोच, शिवाय, नव्या पिढीला सुसंस्कारित आणि आपल्या संस्कृती विषयी जागरूक करण्याच्या हेतूने विशेष बाबी देखील घडवून आणल्या जातात.

 

#GlobalGanesha या वर्षी, सिंगापूरच्या महाराष्ट्र मंडळाच्या गणेशोत्सवाचा मांडव सिंगापूर शहराच्या मध्यवर्ती भागात होता. तिथे पुणे येथील सुविख्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट कडून खास पाठविण्यात आलेली मूर्ती विराजमान करण्यात आली होती. मागे कैलास पर्वताचा देखावा आणि त्यापुढे श्री गणेश, अशी योजना होती. मांडवात शेकडो खुर्च्या लावण्यात आलेल्या होत्या. त्याशिवाय भाविकांच्या येण्याची, दर्शनाची आणि बाहेर जाण्याची रांग आणि सुनियोजित व्यवस्था करण्यात आली होती.

 

गणेश उत्सवाच्या माध्यमाने सिंगापूर येथे नव्या पिढीला आपला इतिहास, आपली संस्कृती आणि आपले संस्कार कळावे या हेतूने सोबत एक छोटेखानी सांस्कृतिक प्रदर्शन लावण्यात आलेले होते, ज्यात कितीतरी गोष्टींचा परिचय घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

#GlobalGanesha

महाराष्ट्राची पारंपरिक वाद्ये, घुंगरू, लेझीम, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील तुतारी, भातुकलीच्या खेळाची ओळख, पूजेचे ताट, छोटी गुढी, पारंपरिक दागिने अशा कित्येक बाबींची नव्या पिढीला ओळख व्हावी, या हेतूने योजना करण्यात आली होती. मुख्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे एक चित्र देखील तिथे होते. सिंगापूरच्या महाराष्ट्र मंडळाच्या वतीने वर्षभरात खूप वैविध्यपूर्ण कार्यक्रम, उपक्रम आदी घेतले जातात. त्यांची दिनदर्शिका (कॅलेण्डर) देखील होती. इथे आठवड्यात विद्यार्थ्याना नियमितपणे मातृभाषा मराठी शिकविण्याचे वर्ग चालतात. त्याची माहिती पण दिली होती, ज्याचा सर्वाना उपयोग घेता येईल, हा हेतू होता.

 

एकूणच, यावर्षीचा महाराष्ट्र मंडळ सिंगापूरचा गणेशोत्सव लौकिकाला साजेसाच होता. तुम्ही सिंगापूर येथे राहत नसाल आणि येण्याचा बेत असेल तर, पुढच्या वर्षी गणेशोत्सवात नक्की या. कारण, बाप्पा तेव्हा पुन्हा येणार आहेत. त्यांना सांगितलंच आहे तसं ..पुढच्या वर्षी लौकर या, म्हणून.

India Input

A web magazine viewed by readers across the globe. Created, owned and managed by INDIA INPUT COMMUNICATIONS, that brings out the latest interesting trends in India and outside on a range of topics, especially the important trends in geopolitics, social media, innovation, start ups, industry, business besides others.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button