मराठी

#GlobalGanesha: US मधील ऑरलँडोचा गणपती राजा! 

प्रत्येक मराठी माणसाने अनुभव घ्यावा असा ऑरलँडोमध्ये मराठी मंडळ आणि हिंदू सोसायटी यांचा संयुक्त गणेशोत्सव..वाचा, कसा अक्षरश: दणक्यात साजरा होतो ते..

#GlobalGanesha#GlobalGanesha मालिकेत आता चला, अमेरिकेतील फ्लोरिडामधील ऑरलँडोच्या गणपती राजाचे दर्शन घेऊया! हा राजा आणि त्याचा विलक्षण ऊर्जेने भारलेला उत्सव,  प्रत्येक मराठी माणसाने अनुभव घ्यावा असा..!

 

बृहन्महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिकेचे अध्यक्ष राहुल देशमुख सांगताहेत,ऑरलँडोमध्ये मराठी मंडळ आणि हिंदू सोसायटी यांचा संयुक्त गणेशोत्सव कसा अक्षरश: दणक्यात साजरा होतो ते.. पाहूया..

 

ऑरलँडोमध्ये मराठी मंडळ आणि हिंदू सोसायटी यांचा संयुक्त गणेशोत्सव गणेश चतुर्थी पासून कधी ७ दिवस किंवा अगदी अनंत चतुर्दर्शीपर्यंत अक्षरश: दणक्यात साजरा होतो. जून – जुलैपासून सजावट, नृत्य – गायन- भजन इत्यादी कार्यक्रम, ढोल-ताशा पथक, पूजा, प्रसाद, लेझीम ग्रुप यांची आखणी आणि तयारी सुरू होते. पुलंच्या नारायणाच्या अंगात लग्न चढते तसे हळू हळू ऑरलँडोकरांच्या अंगात गणेशोत्सव चढतो.

 

गेली २५ किंवा त्याहून अधिक वर्षे ऑरलँडोच्या गणपतीला सजावट म्हणून थीम असतेच. यंदा आग आणि धूर ओकणारा ज्वालामुखी, डोंगरावरून कोसळणारा धबधबा, आकाशाचा पडदा आणि पृथ्वीवर विराजमान झालेला पंचमहाभूतांच्या कोंदणातील बाप्पा असा आमचा देखावा आहे. चार वेगवेगळ्या ठिकाणी, चार गटांनी काम करून हा देखावा एकत्र उभा केला आहे.

 

#GlobalGanesha

गणेश चतुर्थीला संध्याकाळी ढोल-ताशे-लेझीमच्या ठेक्यावर पारंपरिक पद्धतीने रथातून बाप्पाची मिरवणूक काढली जाते. त्यानंतर सामूहिक पूजा, प्रतिष्ठापना आणि आरत्यांचा गजर होतो.

 

मराठी लोक आणि इतर भारतीय मंडळी या सगळ्या समारंभात उत्साहाने सहभागी होतात. रात्री शेकडो लोक एकत्र प्रसाद – सहभोजन करतात.

 

 

त्यानंतर रोज संध्याकाळी, वीक डे असला तरी ५-६ कुटुंबे एकत्र येऊन हौशीने आरती करतात.  त्या जोडीला भजनसंध्या, अथर्वशीर्ष आवर्तन वगैरे कार्यक्रमसुद्धा असतात. रोज काही ना काही कार्यक्रम किंवा आरती तरी हमखास असल्याने एक दिवसात गणेशोत्सव आटोपला, असे नाही. दिवसेंदिवस त्याची रंगत वाढतच जाते. आणि येतो गणेश विसर्जनाचा दिवस.

#GlobalGanesha

 

गणेश चतुर्थीला रथातून तर विसर्जनाच्या दिवशी, ‘पायी हळू हळू चाला – मुखाने गजानन बोला’ म्हणत मंडळी पालखीतून बाप्पाला मिरवतात. मुली आणि स्त्रिया हमखास नऊवारी-नथ इत्यादी तर पुरुष धोतर फेटे पगडी अशी सगळी हौस पुरवून घेतात. १४ विद्या आणि ६४ कलांच्या या दैवताच्या चरणी, नृत्य -गायन- नाटिका- लहान मोठ्यांचे लेझीम नृत्य हा सगळा कलाविष्कार रुजू होतो. सगळ्या बाळगोपाळ मंडळींच्या हस्ते गणपतीची साग्रसंगीत पूजा होते.

 

विसर्जनाच्या दिवशी लहान मुलांच्या हस्ते पूजा करून घेण्याची आता इथे परंपराच झाली आहे. ढोल ताशा पथकातही इथेच जन्मलेली – वाढलेली पिढी भरपूर सक्रिय आहे. ढोल ताशांच्या गजरात , बेभान होऊन मिरवणूकीत नाचत, पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पाला निरोप देण्यात येतो. कधी देवळाच्या मागच्या तळ्यात किंवा हौदात सार्वजनिक आणि खाजगी गणपतींचे विसर्जन होते. पुन्हा एकदा शेकडो लोकांच्या सहभोजनानंतर, आवराआवरी नंतर, भारतापासून हजारो मैलावरच्या या कर्मभूमीत, आपापल्या परीने आपली परंपरा रुजवू बघणारे सगळेजण दमून भागून, पुन्हा एकदा लहान होऊन, नॉस्टॅल्जिक होऊन अतीव समाधानाने घरी परततात.

ऑरलँडोच्या देवळाची देखणी वास्तू आणि सभागृह, गणेशोत्सव आणि सगळेच सण-समारंभ साजरे करण्यासाठी आम्हाला लाभली आहे. भारताचे माजी राष्ट्रपती आदरणीय अब्दुल कलाम यांसह अनेक मान्यवरांनी आमच्या देवळाला भेट दिली आहे. भारतातून इथे आलेल्या कोणाहीसाठी, आपला माणूस भेटण्याची ही हमखास जागा आहे.

टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाने कधीकाळी समाजाला एकत्र आणले. ऑरलँडोतील हे देऊळ आणि आमचा सार्वजनिक गणेशोत्सव आजही, मूळ घर सोडून परक्या भूमीत येऊन रुजलेल्या – रुळलेल्या सर्वांना घट्ट बांधून ठेवत आहे.

गणपतीबाप्पा मोरया !

 

SOURCE : 

https://orlandomarathi.org/

https://www.a2mm.org/

https://www.facebook.com/annarbormarathim/

 https://www.instagram.com/annarbormarathimandal/

 

FEEDBACK : contact @indiainput.com

 

CATCHUP FOR MORE ON : https://indiainput.com

#GlobalGanesha: बर्मिंगहॅममध्ये गणपती सजावटीत वाराणसीची गंगा आरती!

#GlobalGanesha: यूकेच्या कानाकोपऱ्यात बाप्पाचा जयघोष!

#GlobalGanesha: लंडन मध्ये 2 दिवसांच्या गणेशोत्सवात 10 हजारांची गर्दी..!

GANESH FESTIVAL @ABU DHABI: EXCLUSIVE GLIMPSES

India Input

A web magazine viewed by readers across the globe. Created, owned and managed by INDIA INPUT COMMUNICATIONS, that brings out the latest interesting trends in India and outside on a range of topics, especially the important trends in geopolitics, social media, innovation, start ups, industry, business besides others.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button