#GlobalGanesha: केंब्रिजमध्ये मराठी संस्कृतीचा जागर, ‘मोरया’चा जयघोष!
महाराष्ट्र मंडळ केंब्रिजशायरच्या ‘Cambridgeshire Ganeshotsav 2026’ला विविध भारतीय समुदायांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

#GlobalGanesha मालिकेतील या रिपोर्ट मध्ये पाहूया, यू के अर्थात युनायटेड किंगडम च्या जगप्रसिद्ध केंब्रिजमध्ये कसा घुमला ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष!
सातासमुद्रापार ब्रिटनमध्ये मराठी संस्कृतीचा जागर झाला; महाराष्ट्र मंडळ केंब्रिजशायरच्या ‘Cambridgeshire Ganeshotsav 2026’ला विविध भारतीय समुदायांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सातासमुद्रापार ब्रिटनमध्येही यंदा गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला. इंग्लंडमधील ऐतिहासिक केंब्रिज शहरात महाराष्ट्र मंडळ केंब्रिजशायर (MMC) यांच्या वतीने आयोजित ‘Cambridgeshire Ganeshotsav 2026’ मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.
‘गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…’ या जयघोषाने केंब्रिजचा परिसर दुमदुमून गेला. पारंपरिक ढोल-ताशांचा गजर, लेझीमचा ठेका आणि गणरायाच्या स्वागतासाठी एकत्र आलेल्या आबालवृद्धांमुळे महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सवाचा उत्साह थेट इंग्लंडच्या भूमीवर अनुभवायला मिळाला.

पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या कुटुंबांनी गणरायाचे उत्साहात स्वागत केले. गणपतीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना, पूजा आणि आरती करण्यात आली. दर्शनासाठी केंब्रिज आणि आसपासच्या परिसरातील अनेक कुटुंबांनी सहभाग नोंदविला.
परदेशात वास्तव्यास असतानाही आपली भाषा, संस्कृती, सण आणि परंपरांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या गणेशोत्सवाच्या माध्यमातून करण्यात आला.
विविध भारतीय समुदायांचा सहभाग
यंदाच्या गणेशोत्सवाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे हा उत्सव केवळ मराठी समाजापुरता मर्यादित न राहता भारताच्या विविध भागांतील समुदायांना एकत्र आणणारा सांस्कृतिक सोहळा ठरला.
विविध नृत्यशाळा, संगीत समूह, गायक आणि कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. शास्त्रीय नृत्य, भारतीय संगीत तसेच महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या विविध कलाप्रकारांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
विशेषतः लहान मुले आणि तरुणांचा सहभाग हे या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरले. ब्रिटनमध्ये वाढणाऱ्या नव्या पिढीला भारतीय आणि महाराष्ट्रीय संस्कृतीशी जोडण्याच्या उद्देशाने मुलांना विविध कार्यक्रमांत सक्रिय सहभागाची संधी देण्यात आली.
पारंपरिक महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ, दागिने, एथनिक फॅशन आणि विविध व्यावसायिक स्टॉल्समुळे कार्यक्रमाला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले. त्यामुळे उपस्थितांना केंब्रिजमध्येच महाराष्ट्रातील गणेशोत्सवाची झलक अनुभवता आली.
सामाजिक बांधिलकीचाही संदेश
गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी आणि आरोग्यविषयक जागरूकतेचाही संदेश देण्यात आला.
भारतीय समुदायामध्ये Dementia UK विषयी माहिती पोहोचवण्यासाठी विशेष जनजागृती करण्यात आली. धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच समाजासाठी महत्त्वाच्या विषयांवर जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र मंडळ केंब्रिजशायरने केला.
दिवसभर चाललेल्या कार्यक्रमाची उत्तरपूजा आणि गणपती विसर्जन मिरवणुकीने भक्तिमय सांगता झाली. त्यानंतर सर्व भाविक आणि सहभागी कुटुंबांनी एकत्र येऊन महाप्रसादाचा आस्वाद घेतला.
‘पुढच्या पिढीपर्यंत मराठी संस्कृती पोहोचवणे हेच आमचे ध्येय!’

महाराष्ट्र मंडळ केंब्रिजशायरचे अध्यक्ष राहुल इथापे यांनी सांगितले,
“केंब्रिज आणि आसपास राहणाऱ्या महाराष्ट्रातील तसेच भारतातील विविध समुदायांना एकत्र आणणे आणि आपल्या मराठी भाषा, संस्कृती व परंपरांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे, हा महाराष्ट्र मंडळ केंब्रिजशायरचा प्रमुख उद्देश आहे.
Cambridgeshire Ganeshotsav हा केवळ धार्मिक उत्सव नसून आपल्या संस्कृतीचा, सामाजिक एकतेचा आणि भारत व ब्रिटनमधील सांस्कृतिक नात्याचा उत्सव आहे.
ब्रिटनमध्ये वाढणाऱ्या आपल्या पुढच्या पिढीला गणेशोत्सवासारख्या सणांमागील संस्कृती आणि परंपरा प्रत्यक्ष अनुभवता याव्यात, तसेच विविध भारतीय समुदायांना एकत्र येण्यासाठी एक व्यासपीठ मिळावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
या गणेशोत्सवाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सर्व कलाकार, स्वयंसेवक, प्रायोजक, सहभागी संस्था आणि कुटुंबांचे मनःपूर्वक आभार.”
कोअर टीम आणि स्वयंसेवकांचे मोलाचे योगदान
या भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनामागे महाराष्ट्र मंडळ केंब्रिजशायरच्या कोअर टीमसह अनेक स्वयंसेवकांचे मोलाचे योगदान राहिले.
संदीप व प्रियांका कदम, केशव व अश्विनी केळबाईकर, विशाल पेंढारकर, रितेश व शिल्पा चंदावर, जितेंद्र व वृषाली भट्टड, निखिल व अमृता पवार, महेश व स्वप्नाली पैगुडे, संपदा इथापे, श्रेया इथापे, सहाना जोशी, अनुष्का, अर्णव कदम, आरुषी चंदावर वर्षा सावरकर, रुपाली पाटील, सी. डी. तिवारी आणि प्रीतम यांच्यासह अनेक स्वयंसेवकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या.
कार्यक्रमाचे नियोजन, गणपती आगमन व पूजा व्यवस्था, सजावट, सांस्कृतिक कार्यक्रमांचे संयोजन, सूत्रसंचालन, नोंदणी व स्वागत, स्टॉल्सचे व्यवस्थापन, महाप्रसाद व्यवस्था तसेच कार्यक्रमानंतरची आवराआवर अशा विविध स्तरांवर स्वयंसेवकांनी एकत्रितपणे काम केले.
कार्यक्रमाच्या यशासाठी पडद्यामागे परिश्रम घेणाऱ्या सर्व स्वयंसेवक, कलाकार, नृत्य व संगीत संस्था, प्रायोजक, व्यावसायिक सहभागी आणि समाजातील कुटुंबांचे महाराष्ट्र मंडळ केंब्रिजशायरतर्फे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
सातासमुद्रापार जपली जातेय मराठी अस्मिता
ब्रिटनमध्ये वाढणाऱ्या नव्या पिढीला मराठी भाषा, महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरांशी जोडून ठेवण्यासाठी महाराष्ट्र मंडळ केंब्रिजशायर विविध सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवत आहे.
मंडळाचे अध्यक्ष राहुल इथापे यांच्या नेतृत्वाखाली केंब्रिज आणि आसपासच्या भागातील मराठी कुटुंबांना एकत्र आणण्याबरोबरच विविध भारतीय समुदायांमध्ये सांस्कृतिक संवाद आणि सामाजिक एकोपा वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर ब्रिटनमध्येही गणेशोत्सवाच्या निमित्ताने मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरेचा जागर पाहायला मिळाला.
अखेर ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या!’ या जयघोषात Cambridgeshire Ganeshotsav 2026 ची उत्साहपूर्ण आणि भक्तिमय सांगता झाली.
-केंब्रिज, युनायटेड किंगडम.



