मराठी

#GlobalGanesha: लंडन मध्ये 2 दिवसांच्या गणेशोत्सवात 10 हजारांची गर्दी..!

लंडनच्या खुल्या पार्क मध्ये सटन मित्र मंडळाचा भव्य गणेश उत्सव; पारंपरिक मराठी पेहरावात ढोल ताशांच्या गजरात बाप्पांचे धडाक्यात स्वागत!

#GlobalGanesha म्हणजे, यावर्षी जगभरात गणेशोत्सवाला आलेले अभूतपूर्व उधाण! या वर्षी जगभरात गणेशोत्सवात काकणभर जास्तच ऊर्जा आणि उत्साह दिसून येत आहे, वेगळीच धूम बघायला मिळते आहे. हे आम्ही म्हणत नाही, तर जगभरातून येत असलेल्या इनपुट्स वरून यंदा त्याचा वारंवार प्रत्यय येत आहे. लंडनच्या सटन मित्र मंडळाचा भव्य गणेश उत्सव हे याचंच बोलकं उदाहरण. त्यावर, विशेष सचित्र लेख .. सुखदा गरुड यांनी दिलेल्या माहितीवरून..

 

#GlobalGanesha हा हॅशटॅग म्हणजे यावर्षी गणेशोत्सवात गणपती बाप्पा साता समुद्रापार किती ग्लोबल झाले, त्याची प्रचिती! लंडनच्या सटन मित्र मंडळाचा भव्य गणेश उत्सव हे याचंच बोलकं उदाहरण. खुल्या पार्क मध्ये गणेश उत्सव साजरा करणारे हे संपूर्ण यू के मध्ये एकमात्र गणेश मंडळ!

 

#GlobalGaneshaसाता समुद्रापार लंडन मध्ये “मोरयाचे जयघोष” असे काही निनादले, कि दोन दिवसांच्या गणेशोत्सवात 10 हजारांची विक्रमी गर्दी दिसून आली.

 

लंडन च्या सटन भागात खासकरून उभारलेल्या भव्य शामियाना मध्ये अगदी पारंपरिक मराठी पेहरावात ढोल ताशांच्या गजरात बाप्पांचे स्वागत झाले..ड्रोन ने घेतलेल्या फोटो मध्ये शामियानातून गर्दी, हा त्याचाच पुरावा!

 

लंडनमधील सटन मित्र मंडळाच्या वतीने गेल्या सहा वर्षांपासून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. यंदा 19 आणि 20 सप्टेंबर रोजी झालेल्या या उत्सवात अडीचशेपेक्षा अधिक स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सेवा बजावली, तर जवळपास 10,000 गणेशभक्तांनी बाप्पांचे दर्शन घेतले.

 

परदेशात राहूनही भारतीय संस्कृती, परंपरा आणि श्रद्धा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा मंडळाचा हा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. मराठी भाषिक पारंपरिक वेशभूषा, दागिने आणि वेशभूषा करून सहभागी झाले.

नितीश कामत हे मित्र मंडळाच्या काही समन्वयक पैकी एक आहेत. ते सांगतात, “..2008 मध्ये आम्ही मंडळाला सुरुवात केली. सुरुवातीला दिवाळी आणि होळी करिता महिलांनी एकत्र येण्याचे हे एक माध्यम होते. त्यानंतर आम्ही भव्य रूपात दिवाळी साजरी केली. एकशेसाठ ते सुमारे दोनशे कुटुंब सहभागी होऊ लागले. हॉल अपुरा पडायला लागला. गणेशोत्सवाला आम्ही 2021 मध्ये आरंभ केला. हा उत्सव भारतातल्या मोठ्या उत्सवांपैकी एक असून आम्हाला आमच्या मुलांना त्याचा परिचय घडवून आणायचा होता. पहिल्याच वर्षी दोन दिवस मिळून हजार लोक आले. दुसऱ्या वर्षी आकडा अडीच हजार पर्यंत गेला. हॉल ची क्षमता तीनशे पर्यंत असल्याने आम्हाला गर्दीला नियंत्रित करावे लागायचे. एक हजार क्षमता असलेला हॉल सटन भागात नसल्याने आम्हाला खुल्या मैदानात यावे लागले.”

 

#GlobalGanesha
#GlobalGanesha: सटन परिसरातील खुल्या पार्क मधील शामियानात साकारलेला भव्य देखावा.

 

ते पुढे सांगतात की,”खुल्या पार्क मध्ये अशा प्रकारे गणेशोत्सव साजरा करणारे आमचे बहुधा संपूर्ण यू के मध्ये एकमात्र गणेशमंडळ आहे. सुमारे दोनशे चाळीस स्वयंसेवकांच्या मदतीने हे कार्य सिद्ध होते. अवघे दोन दिवस आमचा गणेशोत्सव असला तरी यावर्षी निःशुल्क प्रसादामध्ये दोनशे साठ किलो तांदूळ वापरले जात आहे. यावरूनच आमच्या स्केल ची कल्पना येईल. मुलांच्या परीक्षा देखील याच काळात असल्याने गर्दी वर परिणाम पडला अन्यथा यापेक्षा जास्त लोक आले असते.”

 

#GlobalGanesha

सटन मित्र मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्यांपैकी एक आणि येथील प्रसाद निर्मितीची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणाऱ्या टीम च्या प्रमुख असलेल्या संध्या कामत सांगतात,”..सहा वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करत आहोत. आधी हॉल मध्ये करायचो. पण, गर्दी व्हायला लागली आणि हॉल मध्ये जागा पुरेनाशी झाल्याने आता पार्क मध्ये उत्सव साजरा करतो. हे पार्क मधील चौथे वर्ष आहे. सुमारे दहा हजार भक्त येतात बाप्पांना बघायला. त्यापैकी साडे पाच हजार प्रसादाला असतात. मी प्रसाद कुकिंग टीम ला लीड करते. छान आहे..अडीचशे व्हालांटियर्स (स्वयंसेवक) आहेत आमच्याकडे. आपलं काम समजून बाप्पांची सेवा करतात. मी मुंबईची आहे. पण यामुळे मला मुंबई मिस झाल्यासारखे वाटत नसते.”

 

#GlobalGanesha

मराठी भाषिकांचा असला तरीही लंडनमधील एकूणच भारतीय समुदायाला एकत्र आणत भक्ती, सेवा आणि सांस्कृतिक एकोप्याचा संदेश देणारा हा गणेशोत्सव विशेष आकर्षण ठरत आहे.

 

इथे कुठलीही नोंदणी, कोणतेही रजिस्ट्रेशन नाही, प्रवेश शुल्क नाही. फक्त सकारात्मकता आणि भक्तिभाव सोबत घेऊन या, अशी अपेक्षा असते.

 

तेव्हा, हा रिपोर्ट वाचणारे आपण सुद्धा पुढच्या वर्षी प्लान करून सटन मित्र मंडळाच्या गणेशोत्सवात सहभागी होण्यासाठी लंडन ला या..हाच गोड संदेश लंडन च्या या मित्र मंडळाचा आहे.

India Input

A web magazine viewed by readers across the globe. Created, owned and managed by INDIA INPUT COMMUNICATIONS, that brings out the latest interesting trends in India and outside on a range of topics, especially the important trends in geopolitics, social media, innovation, start ups, industry, business besides others.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button